Hasan Mahmood Indian Goods:भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास अशक्य !
भारतीय मालावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेवर बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांची टीका
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील भारतीय मालावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चा (बी.एन्.पी.चा) पाठिंबा आहे. या मोहिमेविषयी बोलतांना बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी ‘ही मोहीम फसली असून याला फार अल्प लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. देशांतर्गत बाजारात संकट निर्माण करण्यासाठी आणि बांगलादेशाची अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी ही मोहीम चालू करण्यात आली. भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास शक्य नाही’, असे स्पष्ट केले आहे. भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
१. हसन महमूद हे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ‘अवामी लीग पक्षा’चे संयुक्त सरचिटणीसदेखील आहेत. ते म्हणाले की, शेजार्यांशी चांगले संबंध असल्याखेरीज बांगलादेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखणे कठीण आहे.
२. गेल्या आठवड्यात भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बांगलादेशाचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर प्रमुख नेते यांची भेट घेतली. या बैठकीत सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांसह भारताच्या बांगलादेशासमवेच्या सशक्त द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला.