US Senator Lindsey Graham : इस्रायलला गाझावर अणूबाँब टाकण्याची अनुमती मिळायला हवी ! – अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम

अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम यांचे विधान

अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही पर्ल हार्बर (अमेरिकेचे बंदर. दुसर्‍या महायुद्धात जपानने यावर आक्रमण केले होते.) उद्ध्वस्त होतांना पाहिले आणि जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरावर अणूबाँब टाकून दुसरे महायुद्ध संपवले. त्याचप्रमाणे गाझाचे युद्ध संपवण्यासाठी इस्रायलला अणूबाँब टाकायची अनुमती मिळायला हवी, असे विधान अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम यांनी केले आहे. त्याच वेळी ग्राहम यांनी अमेरिकेने जपानवर अणूबाँब टाकण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असेही म्हटले आहे. अमेरिकेने इस्रायलला पुरवले जाणारे ३ सहस्र बाँबचे वितरण रोखले, यावरही त्यांनी टीका केली आहे.

लिंडसे ग्राहम पुढे म्हणाले की, इस्रायलला एक ज्यू देश म्हणून स्वत:ला वाचवण्यासाठी जे काही करावे वाटते, ते त्या करावे. गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्रायलला नाही, तर हमासला उत्तरदायी ठरवायला हवे; कारण हमासने या नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर केला आहे. हमास या लोकांचा ढालीप्रमाणे वापर करणे बंद करत नाही तोवर या लोकांच्या मृत्यूंची संख्या अल्प करणे अशक्य आहे. सामान्य नागरिकांना संकटात टाकणारे असे कोणतेही युद्ध मी इतिहासात पाहिलेले नाही.