कदंब महामंडळाच्या १६ कर्मचार्‍यांवर वन खात्याकडून गुन्हा नोंद

नेत्रावळी अभयारण्यात शिकारीला गेल्याचे प्रकरण

पणजी, १३ मे (वार्ता.) – नेत्रावळी अभयारण्यात साळजिणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ कर्मचार्‍यांना वन खात्याने १२ मे या दिवशी सायंकाळी कह्यात घेतले होते. वन खात्याला या वेळी संशयितांकडून ५ काडतुसे, लायसन्स असलेले १ रायफल, कोयता, कुर्‍हाड, भांडी, ताटे आदी साहित्य सापडले होते. जंगली जनावरांची शिकार करून त्या ठिकाणी पार्टी करण्याचा कर्मचार्‍यांचा बेत होता. कर्मचार्‍यांना पकडल्यानंतर रात्री उशिरा नेत्रावळी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम २७, ३० आणि ३१ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. अभयारण्यात अनधिकृतपणे प्रवेश करून शिकार करणे, काडतुसांसारखे धोकादायक साहित्य नेणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी संशयितांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

राणे म्हणाले, ‘‘नेत्रावळी अभयारण्यात शिकारीला गेलेल्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक यांना आवश्यक सूचना करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांच्या विरोधात कदंब महामंडळाकडेही तक्रार करण्यात येणार आहे.’’ संबंधित सर्व कर्मचारी हे मडगाव कदंब डेपोशी निगडित आहेत. संशयितांनी ते अभयारण्यात शिकारीसाठी गेल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. साळजिणी येथे खाद्यपदार्थ घेऊन पिकनिक करण्यासाठी गेल्याचा संशयितांचा दावा आहे.

कर्मचार्‍यांचा शिकार करण्याचा बेत नव्हता ! – उल्हास तुयेकर, अध्यक्ष, कदंब महामंडळ

या प्रकरणी कदंब महामंडळाचे अध्यक्ष असलेले आमदार उल्हास तुयेकर म्हणाले, ‘‘नेत्रावळी अभयारण्यात साळजिणी येथे शिकारीसाठी गेल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेले सर्व १६ कर्मचारी १३ मे या दिवशी कामावर रूजू झाले आहेत. १६ संशयितांमधील १० जण चालक, तर
६ जण बसवाहक आहेत. १६ मधील ६ संशयित हे नेत्रावळी अभयारण्यात वास्तव्यास असतात आणि १६ जणांच्या गटाने साळजिणी येथे पिकनिक करण्याचे ठरवले होते. त्यांचा अभयारण्यात शिकार करण्याचा बेत नव्हता आणि त्यासाठी त्यांनी समवेत कोंबडीचे मांस, मटण, मासे आदी साहित्य नेले होते; मात्र संबंधित अभयारण्यात आग पेटवून जेवण बनवत असल्याचे वन खात्याला आढळले आहे आणि त्यांच्यावर त्यासंबंधी कारवाई केली जाणार आहे.’’