ऑनलाईन औषधाची विक्री करणार्या आस्थापनाकडून ग्राहकाला मिळणार १ लाख रुपयांची हानीभरपाई !
आस्थापनाने ग्राहकाला बुरशी आलेल्या गोळ्या दिल्या
पुणे – ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकाला रंग गेलेल्या आणि बुरशी आलेल्या गोळ्या पुरवल्या. यासाठी ग्राहकाला १ लाख रुपये हानीभरपाई आणि तक्रार खर्च म्हणून ५ सहस्र रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या प्रणाली सावंत आणि शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याविषयी पंकज जगसिया यांनी ‘मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ आणि कंपनीचे संचालक, ‘दाढा अँड कंपनी’, ‘नेटमेड्स डॉट कॉम’ आणि ‘प्लॅनेट फार्मा वेअरहाऊस प्रा.लि’ यांच्याविरोधात आयोगात तक्रार प्रविष्ट केली होती.
‘मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ आणि कंपनीचे संचालक, ‘दाढा अँड कंपनी’ या प्रकरणात उपस्थित झाले नाहीत, तर ‘नेटमेड्स डॉट कॉम’ आणि ‘प्लॅनेट फार्मा वेअरहाऊस प्रा.लि.’ यांनी मुदतीत त्यांचा जवाब मांडला नाही. त्यामुळे आयोगाने एकतर्फी निकाल देत प्रकरण निकाली काढले.
औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांविषयी जाब देणार्यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही, तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.