मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची पुनश्च टीका !
पुणे – मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या सूत्रावरून वातावरण तापत असतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली. सगळे पुरावे उपलब्ध असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही ? असा प्रश्न रमेश यांनी उपस्थित केला. रमेश स्वत:च्या ट्वीटमध्ये म्हणाले की, मराठीच्या समृद्ध अभिजात इतिहासाचा पुरावा देणारा सबळ अहवाल यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारच्या अखेरच्या काळात शासनाकडे सादर करण्यात आला. असे असूनही मागील १० वर्षांत नरेंद्र मोदी यांनी एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही किंवा नोंद केलेली नाही. (काँग्रेसने तिच्या ६० हून अधिक वर्षांच्या सत्ताकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही ? याचे उत्तर जयराम रमेश यांनी आधी दिले पाहिजे. – संपादक) मार्च २०२२ मध्ये काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी याविषयी राज्यसभेत आवाज उठवला होता. त्यालाही २ वर्षे उलटूनही पंतप्रधान मौन आणि निष्क्रीय आहेत.
रमेश यांच्या या ट्वीटने अभिजात दर्जाचे हे सूत्र पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. पुण्यातील ‘शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनीही याविषयी ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला. अभिजात दर्जा हा महाराष्ट्राच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमान यांचा प्रश्न आहे. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही ? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभांमधून १२ कोटी मराठीप्रेमींना उत्तर द्यावे, ही अपेक्षा आहे’, असे खाबिया यांनी स्वत:च्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या सद्यःस्थितीविषयी गोंधळाचे वातावरण आहे. याविषयी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीकडून जी. किशन रेड्डी यांनाच पत्र लिहीत याविषयी विचारणा करण्यात आली आहे.