निवडणूक अधिकार्‍यांनी पैसे खाल्ले का ?- मनसेचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर येथे मतदारांना उन्हात उभे रहावे लागत असल्याचा दावा !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात क्रांती चौक परिसरात असलेल्या श्रेयस विद्यालय केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारांना उन्हामध्ये रांग लावावी लागली. निवडणूक आयोगाच्या वतीने सावलीची व्यवस्था करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. असे असतांना निवडणूक आयोगाने पाठवलेले पैसे निवडणूक अधिकार्‍यांनी खाल्ले कि कंत्राट घेणार्‍या कंत्राटदाराने खाल्ले ? असा गंभीर प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी १३ मे या दिवशी उपस्थित केला. (निवडणूक अधिकार्‍यांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ! – संपादक)

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या विरोधात ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अशी लढत होत आहे. क्रांती चौक परिसरामध्ये असलेल्या श्रेयस विद्यालयात मतदान केंद्रावर मतदारांना उन्हामध्ये रांगेत उभे रहावे लागत आहे. वास्तविक निवडणूक आयोगाने सर्व मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असतांनाही येथे सावलीचा तंबू का टाकण्यात आला नाही ? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात लवकरात लवकर योग्य कारवाई करावी, अन्यथा आम्ही मतदान प्रक्रिया बंद पाडू, अशी चेतावणीही मनसेने दिली आहे.