Soft Target SANATAN SANSTHA : (म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असून तिच्यावर बंदी आणा !’ – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जावईशोध
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आरोपी करण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दांभिकपणा !
पुणे – अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी ३ आरोपींची निर्दाेष सुटका आणि २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर सनातनद्वेषाची कावीळ झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सनातन संस्था ही आतंकवादी संस्था असून या संस्थेवर देशव्यापी बंदी आणावी’, अशी मागणी केली आहे.
१. सनातनवरील बंदीच्या संदर्भात धादांत खोटी माहिती सांगणारे चव्हाण !
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, सनातन संस्था ही आतंकवादी संस्था आहे. मी मुख्यमंत्री असतांना आम्ही ‘सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी आणा’, अशी अधिकृत विनंती केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी २ वर्षे आधी ही बंदी घालावी, अशी विनंती केली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुन्हा पत्र लिहिले होते. वर्ष २०११ मध्ये आम्ही १ सहस्र पानांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवली होती. ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला, त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला, ही माझी पहिली प्रतिक्रिया मी आज पुन्हा देत आहे. (पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला, तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचेच सरकार होते, मग सनातन संस्थेवर बंदी का घालण्यात आली नाही ? याचे उत्तर काँग्रेसनेच द्यावे. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी सनातन संस्थेवरील बंदीच्या प्रस्तावामध्ये बंदी घालण्यासारखे ठोस पुरावे नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दांभिकपणा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच उघड केला आहे ! – संपादक)
२. सनातनच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, तरीही सातत्याने सनातनवर घसरणारे चव्हाण !
चव्हाण पुढे म्हणाले की, पोलिसांनी पर्याप्त पुरावा सादर न केल्यामुळे ३ आरोपींची निर्दाेष सुटका झाली. हा एक कट होता. या कटात कोण आणि कोणत्या संस्था सामील होत्या ? याचे स्पष्टीकरण आलेले नाही. (डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अन्वेषण चालू करण्यापूर्वीच नथुराम गोडसे प्रवृत्तीने हत्या केल्याचा निष्कर्ष वर्तवून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करण्याचे संकेतच अन्वेषण यंत्रणांना दिले. त्यानुसार ११ वर्षे अन्वेषण यंत्रणांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अन्वेषण केले आणि आता मुख्य सूत्रधार सापडला नाही, अशी आवई उठवत आहेत. आरोपींनाही तब्बल २ वेळा पालटण्यात आले. अशा प्रकारे गलथान अन्वेषणाविषयी न्यायालयाने वारंवार अन्वेषण यंत्रणांची खरडपट्टीही काढली आहे. याला पृथ्वीराज चव्हाण यांचे दायित्वशून्य वक्तव्यच कारणीभूत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळेच अन्वेषण भरकटले, ही वस्तूस्थिती आहे. – संपादक)
ते म्हणाले की, मुख्य सूत्र असे की, हा कट कुणी शिजवला ? मुख्य सूत्रधार कोण ? याविषयी भाष्य ऐकायला मिळालेले नाही. या प्रकरणातील कटाचे कारस्थान दडपण्यात आले आहे, असा मला संशय वाटतो. सनातन संस्थेचा यामध्ये काय ‘रोल’ (भूमिका) आहे ? गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या खुनात काही तारा जुळतात का ? याविषयी कुणी काही बोललेले नाही. (मागील ११ वर्षे दाभोलकर हत्येप्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेचे साधक आणि आश्रम यांची चौकशी केली मात्र त्यांना यात सनातनचा सहभाग आढळलेला नाही. असे असतांना पृथ्वीराज चव्हाण पुन्हा सनातनवरच घसरत आहेत. यावरून त्यांचा सनातनद्वेष दिसून येतो. – संपादक)
Soft Target @SanatanSanstha : (म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असून तिच्यावर बंदी आणा !’ – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जावईशोध
वाचा https://t.co/8G2vcYaloL#Sanatan_Innocence_Proved
पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे… pic.twitter.com/NQV2WGtCBg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 14, 2024
आमचा अजूनही विश्वास आहे की, सनातन संस्था ही आतंकवादी संघटना आहे. दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी एप्रिल २०११ मध्ये म्हणजे २ वर्षांपूर्वी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या सूचना आणि विनंतीवरून आमच्या सरकारच्या गृहखात्याने म्हणजे त्या वेळेचे महाराष्ट्र गृहखात्याचे सचिव उमेश सारंगी त्यांच्या हस्ताक्षराने सनातन संस्थेला ‘अन्लॉफूल ॲक्टिव्हीटी ॲक्ट’ (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा)नुसार या कायद्याखाली ‘सनातनवर देशव्यापी बंदी आणा, आतंकवादी संघटना म्हणून त्यांना बॅन करा’, अशी अधिकृत विनंती माझ्या सरकारने एप्रिल २०११ देहली येथील केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एका पत्राद्वारे पाठवली होती. (कोणताही ठोस पुरावा नसतांना चव्हाण यांनी केवळ पुरोगाम्यांचा कंड शमवण्यासाठी यामध्ये सनातनला गोवण्याचा प्रयत्न केला. सनातनला गोवून चव्हाण यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आताही राजकीय लाभासाठी पृथ्वीराज चव्हाण सनातनला आतंकवादी संघटना ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. – संपादक)
३. अन्वेषण भरकटवण्यात काँग्रेसही उत्तरदायी असतांना चव्हाण यांचा साळसूदपणा !
चव्हाण पुढे म्हणाले की, आम्ही दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी २ वर्षे सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी; म्हणून महाराष्ट्राच्या गृहखात्याने केंद्र सरकारच्या गृहखात्याला विनंती केली होती; मात्र २-३ वर्षे काही झाले नाही. नंतर वर्ष २०१३ दाभोलकरांची हत्या झाली. त्यानंतर आम्ही पुन्हा वर्ष २०१४ मध्ये सहस्रो पानांचे संच पुन्हा केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले होते, त्यावरही काही निर्णय झाला नाही. ही गोष्ट अजूनही अनिर्णयित आहे. यावर अंतिम निर्णय झालेला नाही. (याचे कारण सनातन ही आतंकवादी नव्हे, तर धार्मिक कार्य करणारी संस्था आहे. – संपादक) सनातन संस्थेवर बाँबस्फोटाचे बरेच खटले चालू होते. या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, हे शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश आलेले आहे. पोलिसांचे हात कुणीतरी बांधल्यासारखे वाटतात. (काँग्रेसचे सरकार असतांना अन्वेषण यंत्रणांचे हात कुणी बांधले होते ? केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी काँग्रेसने सनातनवर कायम अन्यायच केला असल्याचे यातून सिद्ध होते ! – संपादक)