साधनेचे दृष्टीकोन समजून घेऊन त्यानुसार प्रयत्न करून स्वतःत पालट घडवणारे आनंदी कुटुंब – श्री. परशुराम पाटील, सौ. पूजा पाटील आणि श्री. सूरज पाटील !
१३ मे या दिवशी लेखातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/793148.html
२. श्री. सूरज पाटील
(श्री. परशुराम पाटील यांचा मुलगा ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ आ. श्री. परशुराम पाटील (श्री. सूरज यांचे वडील) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ आ १ आ. मनाविरूद्ध घडणार्या प्रसंगांत वडिलांनी ‘आश्रमात साधना आणि सेवा करून स्वतःला पालटण्यासाठी आलो आहे’, असा दृष्टीकोन ठेवायला सांगणे : मी माझ्या बाबांना (श्री. परशुराम पाटील यांना) असे प्रसंग सांगत असे. त्या वेळी बाबा मला सांगत असत, ‘‘आपण साधना करायला आलो आहोत. आपण इतरांच्या चुका आणि त्यांचे स्वभावदोष बघायचे नाहीत. साधक येईपर्यंत तू नामजप आणि स्वयंसूचना सत्र कर. आपण आश्रमात स्वतःतील स्वभावदोष घालवून स्वतःत पालट करण्यासाठी आलो आहोत.’’
२ आ १ इ. मी बाबांनी सांगितलेले प्रयत्न हळूहळू करू लागलो. साधक उशिरा आल्यास आता मी शांत राहून ते स्वीकारतो. ‘साधकांना वेळेत येण्यासाठी अडचण असेल’, असे समजून मी त्या कालावधीत नामजप आणि प्रार्थना करण्याकडे लक्ष देतो.
२ आ २. आश्रमातील साधकांनी वडील करत असलेल्या सेवेचे कौतुक करणे : अनेक साधकांनी मला सांगितले, ‘‘तुझ्या वडिलांची झोप पूर्ण होत नाही, तरीही ते आनंदी असतात. त्यांच्या चेहर्याकडे पाहून ‘ते पुष्कळ दमले आहेत’, असे कधीच वाटत नाही. त्यांचा चेहरा सकाळी जसा प्रसन्न असतो, तसाच रात्री १२ वाजताही असतो. त्यांचा चेहरा प्रसन्न आणि चैतन्यमय दिसतो.’’
२ आ ३. वडिलांनी साधकांना प्रेमाने साहाय्य करणे आणि साधकांना त्यांचा आधार वाटणे : बाबा आध्यात्मिक स्तरावर विचार करतात. घरात काही प्रसंग घडल्यास ते आम्हाला प्रेमाने समजावून सांगतात. ते आश्रमातील साधकांच्या अडचणी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे प्रेमाने सोडवतात. साधकांच्या साधनेत येणार्या अडचणी दूर होण्यासाठी बाबा त्यांना पुष्कळ प्रेमाने साहाय्य करतात. त्यामुळे आश्रमातील साधकांना बाबांचा आधार वाटतो. त्यांची अनेक साधकांशी जवळीक आहे.
२ इ. सौ. पूजा परशुराम पाटील (श्री. सूरज यांची आई, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५१ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ इ १. इतरांचा विचार करणे : आईने मला भ्रमणभाष केल्यास ती ‘‘सूरज, तू सेवा करत आहेस का ? तुला २ मिनिटे बोलायला वेळ आहे का ?’’, असे विचारून नंतरच माझ्याशी बोलते.
२ इ २. आईचा प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती भाव
२ इ २ अ. ‘आपल्यात भाव असेल, तर प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आपल्याला (सूक्ष्मातून) कुठेही भेटू शकतात’, असे आईने सांगणे
एकदा आमच्यात झालेले संभाषण येथे दिले आहे.
आई : तुला प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भेटतात का ? आश्रमातील सगळे साधक कसे आहेत ?
मी : मला प्रतिदिन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ कशा भेटतील ?
आई : तू आश्रमात राहून तुला त्या भेटत नाहीत. मी घरी असूनही मला त्या प्रतिदिन (सूक्ष्मातून) भेटतात. मी प्रतिदिन त्यांच्याशी बोलते.
मी : त्या तुला कशा भेटतात ? तू त्यांच्याशी कसे बोलतेस ?
आई : आपल्यात भाव असेल, तर सगळे काही शक्य आहे. त्या आपल्याला कुठेही भेटू शकतात. आपण ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीत आहोत. आपण त्यांच्याशी बोलत आहोत’, असा सातत्याने भाव ठेवला की, त्या प्रतिदिन आपल्याला भेटू शकतात.
२ इ २ आ. वाढदिवसाच्या दिवशी आईने ‘सगळ्या देवांना प्रार्थना कर आणि प.पू. डॉक्टर अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आशीर्वाद घे’, असे सांगणे
२ इ २ आ १. आईने ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा वाटा उचलता येऊ दे आणि या सेवेत सहभागी करून घ्या’, अशी प्रार्थना करायला सांगणे : २८.१.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी आईने मला सकाळी भ्रमणभाष करून आशीर्वाद दिला. तिने मला सगळ्या देवांना प्रार्थना करायला सांगितली, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मला खारीचा वाटा उचलता येऊ दे. मला या सेवेत सहभागी करून घ्या.’ आईने मला सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आशीर्वाद घे.’’
२ इ २ आ २. तेव्हा मी तिला म्हणालो, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भेटल्यावर मी त्यांचा आशीर्वाद घेईन आणि प.पू. डॉक्टरांना मानस नमस्कार करीन.’’
२ इ २ आ ३. आई मला म्हणाली, ‘‘तू प्रार्थना केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ तुला निश्चित भेटतील.’’ नंतर काही वेळाने मला वाहनतळात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भेटल्या. त्यांनी मला ‘‘सूरज, कसा आहेस ? बरा आहेस ना ?’’ असे विचारले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ इ २ आ ४. ‘आपल्यातील देवाप्रतीच्या भावात वृद्धी झाली की, आपली प्रार्थना देवापर्यंत पोचते आणि देव आपल्याला कसाही भेटतो’, याची मला अनुभूती आली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.२.२०२३) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |