शारीरिक त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघण्यास प्रारंभ केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

कु. स्नेहल सोनीकर

१. शारीरिक त्रास होऊ लागल्यावर तो स्वीकारता न येणे आणि त्यामुळे नकारात्मकता निर्माण होणे

‘मला शारीरिक त्रास होऊ लागल्यावर आधी मला तो स्वीकारता येत नसे. ‘तो व्हायला नको किंवा अल्प प्रमाणात व्हावा’, असे मला वाटत असे. ‘एवढे उपचार करूनही त्रास न्यून का होत नाही ? या त्रासामुळे मला अपेक्षित अशी सेवा करता येत नाही’, असे विचार मनात येऊन मला मानसिक त्रास होत असे. माझे मन नकारात्मकतेकडे जाऊन मनात न्यूनगंड निर्माण होत असे. माझ्या शारीरिक त्रासांत कोणतीही सुधारणा होत नव्हती.

२. नकारात्मक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून केलेले साहाय्य !

एकदा मी साधनेच्या साहाय्याने या स्थितीतून बाहेर पडण्याचा ठाम निश्चय केला. तेव्हापासून मी परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ‘या स्थितीत मी साधना म्हणून काय केले पाहिजे ?’, हे तुम्हीच सांगा’, असे विचारण्यास प्रारंभ केला. त्यानंतर परम पूज्यांनी मला आतून मार्गदर्शन करून साहाय्य करण्यास प्रारंभ केला. त्यांनी ‘सेवा आणि व्यष्टी साधना यांतून जशी साधना होते, तशीच शारीरिक त्रास स्वीकारून अन् भोगून त्यातून साधनाच होते. आता तुला ती साधना करायची आहे’, असे सुचवले आणि ते मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचनाही सुचवल्या.

३. गुरुदेवांनी सुचवल्यानुसार प्रयत्न चालू केल्यावर मनाच्या स्थितीत परिवर्तन होणे आणि त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाता येऊ लागणे

परम पूज्यांनी सुचवल्याप्रमाणे प्रयत्न करण्यास प्रारंभ केल्यावर माझ्या मनाच्या स्थितीत परिवर्तन झाले आणि मला माझ्या त्रासांकडे भावनिक दृष्टीऐवजी आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाता येऊ लागले. जेव्हा शारीरिक त्रासास प्रारंभ होत असे, तेव्हा माझ्या मनाची पुढील विचारप्रक्रिया होऊ लागली, ‘शारीरिक त्रास स्वीकारून ते भोगण्याच्या साधनेचा कालावधी चालू झाला आहे’, हे लक्षात घेऊन ‘निरपेक्षपणे नामजपादी उपाय आणि औषधोपचार करणे, साधनेच्या चिंतनात रहाणे’, हे देवाला माझ्याकडून अपेक्षित आहे. यातूनच माझी साधना होऊन परम पूज्य मला साधनेच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जाणार आहेत. ‘उपचार आणि उपाय यांचा परिणाम किती होणार ?’, हे माझ्या हातात नाही. ते देवाच्या हातात आहे. त्याचा निर्णय योग्यच असणार. तो मला स्वीकारायला हवा.’

४. दैवी कणांच्या माध्यमातून गुरुदेवांनी स्थुलातून त्यांच्या प्रीतीची साक्ष दिल्याचे जाणवणे

काही कालावधीने वेदना होणार्‍या माझ्या अवयवांवर सोनेरी दैवी कण दिसू लागले आणि त्रास आधीपेक्षा सुसह्य झाले. ‘दैवी कणांच्या माध्यमातून परम पूज्यांनी मला त्रासांशी लढण्यासाठी त्यांचे चैतन्य दिले आणि स्थुलातून त्यांच्या प्रीतीची साक्ष दिली’, असे मला जाणवले.

‘परम पूज्यांनीच माझ्याकडून हे लिखाण करून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. स्नेहल सोनीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक