देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती
१. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील आरतीच्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज हसत असून त्यांचे ओठ हलत आहेत’, असे दिसणे
‘मी प्रतिदिन सकाळी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीसाठी जाते. ७.३.२०२४ या दिवशी आरती संपत आली असतांना माझी दृष्टी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे गेली. ते माझ्याकडे पाहून हसत होते आणि ‘हसतांना त्यांचे ओठ हलत आहेत’, असे मला दिसले. हे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
२. प.पू. भक्तराज महाराज यांनी सनातनचे ३ गुरु (टीप १) आणि सनातनचे आश्रम यांविषयी काढलेले कौतुकोद्गार !
(टीप १- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ)
२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे परम शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार ! : प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, ‘माझा शिष्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) फार गुणी आणि प्रामाणिक आहे. मी त्याला तेव्हाच ओळखले होते. तो ईश्वराचा अवतार (टीप २) आहे. तो सगळ्या जगाचे कल्याण करील. त्याने माझी आणि माझे श्री गुरु श्री अनंतानंद साईश यांची सेवा पूर्ण केली आहे. त्याने माझी गाडी पुष्कळ चांगल्या प्रकारे सुरक्षितपणे सांभाळली आहे. (प.पू. भक्तराज महाराज यांनी अनेक वर्षे भ्रमणासाठी वापरलेले चारचाकी वाहन पनवेल येथील सनातनच्या आश्रमात उत्तमरित्या सांभाळले आहे.)
(टीप २ – महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे सांगितले आहे.)
२ आ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २ देवीही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या रूपात प्रकट झाल्या आहेत. (टीप ३)
(टीप ३ – महर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘भूदेवी’ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीदेवी’, असे संबोधले आहे.)
२ इ. रामनाथी आश्रम चारधामप्रमाणे तीर्थक्षेत्र झाला असणे : रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम चारधामप्रमाणे तीर्थक्षेत्र झाला आहे. अलीकडे देवद (पनवेल) आश्रमातीलही चैतन्य पुष्कळ वाढले असून तोही रामनाथी आश्रमाप्रमाणेच झाला आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवद आश्रमात येऊन गेल्यापासून येथील सर्व संत आणि साधक पुष्कळ आनंदी आहेत.’
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका देवद आश्रमात येणार असल्याविषयी मिळालेली पूर्वसूचना !
शेवटी प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या पादुका माझ्यासमोर ठेवल्या. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर २ दिवसांनी, म्हणजे ९.३.२०२४ च्या रात्री खरोखरंच प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका देवद आश्रमात आल्या.
‘प.पू. भक्तराज महाराज यांनी देवद आश्रमात पादुका येण्यापूर्वीच मला त्याविषयी पूर्वसूचना देऊन अनुभूती दिली’, यासाठी मी प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती मंदाकिनी चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |