रखरखता उन्हाळा प्रकृती सांभाळा !
उन्हाळा स्वभावाने कोरडा ऋतू आहे. यामध्ये अंगामधील कोरडेपणा वाढायला प्रारंभ होतो, तसेच वात दोष साठायला चालू होतो. नैसर्गिकरीत्या रसाळ फळे उन्हाळ्यात म्हणूनच अधिक प्रमाणात येतात. त्या अनुषंगाने उन्हाळ्यात पाळायची काही पथ्ये :
१. आहार हा पातळ, मधुर रसाचा, स्निग्ध, फार गरम नसलेला, कमी मसालेदार आणि हलका असावा. यामध्ये पुढील काही पदार्थ येतात – भात, मूग, मसूर, घावन, भाकरी (ज्वारी, तांदूळ आणि नाचणी), नाचणी/शिंगाडा लापशी, फळभाज्या, नारळ, खीर, शिरा, तूप, लोणी, दूध, खडीसाखर इत्यादी.
२. जेवणात देशी गायीचे तूप आहारात अवश्य असावे. तहान भूक मारू नये. एकदम अधिक आहार घेण्यापेक्षा मध्यम प्रमाणात आणि थोड्या थोड्या वेळाने आहार घ्यावा. मनुक्यांचे पाणी, लाह्यांचे पाणी, सरबत आणि फळांचे रस घ्यावे.
३. भाजीसाठी मसाला वापरायचा झाल्यास गरम मसाला किंवा हिरव्या मिरची यांच्याऐवजी जिरे, धने, तीळ कूट वापरता येईल. आले, काळी मिरी, लिंबू, कोथिंबीर हे पदार्थांची चव वाढवतात.
४. आंबट, खारट, तिखट पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये बदाम, काजू, पिस्ता, चिंच, चाट पदार्थ, ब्रेड, हिरवी मिरची, मसाल्याचे आणि बेकरी पदार्थ येतात. कच्च्या भाज्या, भिजवून मोड आणलेली कडधान्ये तशीच खाऊ नयेत.
५. ताक अधिक प्यायला नको. जेवणामध्ये एखादी वाटी सैंधव जिरे घालून ताक चालेल. जळजळ, आंबट ढेकर असे त्रास होत असल्यास ताक पूर्ण टाळावे.
६. मद्यपान, सिगारेट पूर्ण टाळावे. उष्ण ऋतूमध्ये यामुळे जळजळ, दाह, आम्लपित्त, चक्कर, सूज हे त्रास होतात.
७. दिवसा थोडे झोपायला हरकत नाही. रात्री जागरण करू नये.
८. व्यायाम करत असल्यास मुद्दाम अधिकचा व्यायाम, दगदग टाळावी. नेहमीच्या व्यायामापेक्षाही न्यून व्यायाम करावा.
९. उन्हाळ्यातील त्वचेचा कोरडेपणा घालवायला पायाला तूप किंवा खोबरेल तेल वापरता येईल. उन्हातून गाडीवर येणे-जाणे होत असल्याने डोळे लाल होत असल्यास वा डोळ्याची आग होत असल्यास शतधौत घृत पायाला आणि डोळ्यासाठीची औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत.
१०. रखरखीत उन्हात (सकाळी ११ ते दुपारी ४) उन्हात दुचाकीवर फिरणे टाळावे. उन्हात जायचेच झाल्यास टोपी किंवा ‘स्कार्फ’ (डोके आणि चेहरा झाकण्यासाठी बांधण्यात येणारा मोठा रूमाल) अवश्य असावा.
११. उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.
१२. घुळणा फुटणे (उष्णतेमुळे नाकातून रक्त येणे), हा त्रास होत असता साखर पाणी, लोणी, मध खडीसाखर, दुर्वाकल्प यांचा वैद्यांच्या सल्ल्याने वापर करावा. उन्हाळी लागणे (लघवीला जळजळ, वारंवार; पण अर्धवट मूत्रप्रवृत्ती) हे त्रास असता धने-जिरे पाणी उपयोगी ठरते.
सर्वांनीच हे काही सोपे नियम पाळले, तर उन्हाळा लाभदायी ठरेल.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (७.५.२०२४)