विहित कर्मातून परमेश्वरी कृपा होते, हा शंकराचार्यांचा उपदेश अंगीकारणे आवश्यक ! – वेदमूर्ती सचिन भाटवडेकर
आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त रत्नागिरीत व्याख्यान
रत्नागिरी – आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी अत्यंत नम्र होऊन विभिन्न छंदात स्तोत्ररचना केल्या आहेत. ते अतिशय विद्वान पंडित होते; परंतु आपल्यासारख्या सामान्यांसाठी या सर्व स्तोत्ररचना करून सनातन वैदिक हिंदु धर्माचा आसेतू हिमाचल प्रसार केला. वेदांचा नित्य अभ्यास करा, त्यातून ज्ञान आणि विज्ञानाची उत्पत्ती होते. विहित कर्म करा, त्यातून परमेश्वरी कृपा होते, असा उपदेश शंकराचार्यांनी केला आहे. तो अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी केले.
शहरातील झाडगाव येथील श्री. गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात श्री. भाटवडेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सचिव जयराम आठल्ये, डॉ. कल्पना आठल्ये, कर्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई उपस्थित होत्या. या वेळी श्री. भाटवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
वेदमूर्ती भाटवडेकर पुढे म्हणाले की,
१. एकदा काशीक्षेत्रात गंगास्नानाला जातांना शंकराचार्यांसमोर चांडाळ आला. तो अत्यंत गलिच्छ, फाटक्या वस्त्रांसह, कुत्र्यांना घेऊन होता. त्याला दूर होण्यास शंकराचार्यांनी सांगितल्यानंतर त्याने ‘मला म्हणजे कुणाला सांगत आहात, शरिराला की आत्म्याला’, असा प्रश्न विचारला. ‘ज्याच्याकडून ज्ञान मिळते, तो गुरुच असतो’, या हेतूने शंकराचार्यांनी त्याला वंदन केले आणि चांडाळाकरता मनीषापंचकम् हे स्तोत्र रचले.
२. भिक्षा मागण्यासाठी गेले असता गरीब महिलेकडे देण्यासाठी काहीच नव्हते, तिने सुकलेला आवळा दिल्यानंतर शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्र रचले आणि त्यामुळे महिलेच्या घरात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला.
३. शिष्याच्या चुकीमुळे झालेल्या घटनेवेळी संवाद साधतांना त्यांनी हस्तामलक स्तोत्र रचले.
४. षट्पदि स्तोत्र, उपदेश करणारे पंचकस्तोत्र महत्त्वाचे आहे. अविनय म्हणजे उद्धटपणा. शास्त्रात अविनय म्हणजे अज्ञान. पहिलेच मागणे मागितले अज्ञान दूर होऊ दे. आपल्या बुद्धीत ६ प्रकारचे तेज येऊ दे. बुद्धी संपन्न होऊ दे. श्रवण, ग्रहण, धारण, विज्ञान, उहापोह आणि तत्त्वाभिनिवेश असा जो होतो तो विनयशील होतो. ज्ञानाने अहंकार गळून पडतो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य शंकराचार्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातीन संस्कृतच्या विद्यार्थिनी मीरा काळे यांनी स्तोत्रगायन केले. त्यांचा सत्कार वेदमूर्ती भाटवडेकर यांनी केला. डॉ. कल्पना आठल्ये यांनी वेदमूर्ती भाटवडेकर यांचा परिचय करून दिला. गेली ८ वर्षे पाठशाळेच्या वतीने शंकराचार्य जयंती कार्यक्रम केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक करतांना ‘आपण प्रतिवर्षी किमान १ स्तोत्र मुखोद्गत करावे, असे आवाहन केले. अधिवक्ता आशिष आठवले यांनी सूत्रसंचालन केले. सचिव जयराम आठल्ये यांनी आभार मानले. पाठशाळेचे व्यवस्थापक ओंकार पाध्ये यांनी आयोजनात साहाय्य केले.
बद्रीनारायणाची मूर्ती स्थापनाशंकराचार्यांनी बद्रीनारायण भगवंतांची मूर्ती स्थापना केली आणि शैव पंथाचा शंकर वैष्णव पंथाचा झाला. शंकराचार्यांची गुरुपरंपरा भगवान परत्मामा, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, सत्शिष्य, गौडपाद, गोविंदपादाचार्य आणि त्यांचे शिष्य शंकराचार्य. भारतात संपूर्ण हिंदु धर्माची, सनातन वैदिक धर्माची पताका फडकावणारे शंकराचार्य यांचे दिव्य कर्तृत्व होते. |