धर्माचरणाची आवड असणारा आणि कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारा जमशेदपूर (झारखंड) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बी. चैतन्य (वय १० वर्षे) !
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. बी. चैतन्य महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.४.२०२४) |
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. बी. चैतन्य हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. प्रामाणिकपणा : ‘चैतन्य घोडेस्वारी करायला शिकत आहे. शहरात झालेल्या घोडेस्वारीच्या स्पर्धेत त्याला दुसरे बक्षीस (रौप्य पदक) मिळाले. त्या वेळी घोडेस्वारी शिकवणार्या शिक्षकाच्या पत्नीने त्याला सांगितले, ‘‘आमच्या घरी बरीच पदके आणि विजयचिन्हे (ट्रॉफीज्) ठेवल्या आहेत. त्यांतील सुवर्णपदक आणि विजयचिन्ह घेऊन तुझे छायाचित्र काढून ‘सोशल मिडिया’वर ठेव. कोणाला काही समजणार नाही.’’ त्या वेळी चैतन्य म्हणाला, ‘‘मला माझ्या परिश्रमाने जे मिळाले आहे, त्यात मी आनंदी आहे. अशी खोटी छायाचित्रे काढून घेण्यापेक्षा पुढील वर्षी मी आणखी कष्ट करण्याचा प्रयत्न करीन.’’
२. मोठ्या सुटीत शिक्षक अधिक गृहपाठ देतात. तेव्हा चैतन्य सुटीच्या आरंभीच अभ्यास पूर्ण करतो.
३. प्रेमभाव
अ. फेब्रुवारी २०२४ मध्ये चैतन्यच्या आजीचे निधन झाले. तेव्हापासून तो त्याच्या आजोबांची अधिक काळजी घेत आहे. त्यांना एखाद्या वस्तूची आवश्यकता असेल, तर तो ती लगेच आणून देतो. तो आजोबांशी बोलतो, त्यांच्याशी खेळतो आणि ‘त्यांना एकटेपणा जाणवू नये’, याची काळजी घेतो.
आ. घोड्यावर बसल्यावर तो घोड्याशी प्रेमाने बोलतो. त्याला कधी मारत नाही. घोडेस्वारी करून झाल्यावर तो शिक्षकांना सांगतो, ‘‘आज घोड्याने पुष्कळ मेहनत केली आहे. त्याला चांगली विश्रांती द्या.’’
४. घराची स्वच्छता करण्यासाठी चैतन्य त्याच्या आईला साहाय्य करतो.
५. एखाद्या मित्राने घोडेस्वारी वर्गात चैतन्यचा घोडा मागितला, तर तो लगेच त्याला घोडा देऊन स्वतः दुसर्या घोड्यावर बसतो.
६. चैतन्य शिक्षक आणि आई-वडील यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतो. तो शाळेतील आणि घोडेस्वारी शिकवणारे शिक्षक यांचा लाडका आहे.
७. तो शाळेतून घरी परत आल्यावर सर्व चांगल्या-वाईट गोष्टी मला मनमोकळेपणाने सांगतो.
८. समजूतदारपणा : त्याच्या आजीची प्रकृती ठीक नसतांना आम्हाला बर्याचदा रुग्णालयात जावे लागत असे. त्या वेळी चैतन्य आम्हाला मुळीच त्रास देत नसे. तो स्वतःची सर्व कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करत असे.
९. धर्माचरण करणे
अ. सकाळी झोपेतून उठल्यावर प्रथम तो ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्लोकाचे पठण करतो. ‘अन्नपूर्णे सदा पूर्णे…’ या श्लोकाचे पठण करून भोजनाला आरंभ करतो. तो रात्री झोपण्यापूर्वी क्षमायाचना आणि निद्रादेवीला प्रार्थना करतो.
आ. लहानपणापासूनच ‘श्रीकृष्ण त्याचा मामा आहे’, असा त्याचा भाव आहे. तो श्रीकृष्णाला सांगूनच घरातून बाहेर पडतो.
इ. चारचाकीत किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी तो स्वतः प्रार्थना करतो आणि आम्हालासुद्धा प्रार्थनेची आठवण करून देतो.
ई. तो शाळेत जाण्यापूर्वी प्रतिदिन भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो. त्यानंतर तो आई-वडील आणि आजोबा यांना नमस्कार करतो.
उ. लहानपणापासून चैतन्य त्याचा वाढदिवस केक कापून साजरा न करता शास्त्रानुसार साजरा करतो.
१०. सात्त्विक गोष्टींची ओढ : तो प्रतिदिन वहीचे एक पानभर नामजप लिहितो. तो रविवारी होणार्या ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात सहभागी होतो.
११. त्याच्याकडून चूक झाली, तर ती स्वीकारून तो क्षमा मागतो आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी प्रयत्न करतो.
१२. तो प्रासंगिक ग्रंथ वितरण कक्षाच्या ठिकाणी विविध सेवांत साहाय्य करतो.
१३. वडिलांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे
अ. तो चारचाकीत बसल्यावर स्वतः सुरक्षापट्टा (सेफ्टी बेल्ट) लावतो आणि मी पट्टा लावला नसेल, तर मला त्याची जाणीव करून देऊन सुरक्षापट्टा लावण्यास सांगतो.
आ. दुचाकीवरून घराच्या जवळच जायचे असल्यास मी शिरस्त्राण घालण्यास टाळाटाळ करतो. त्या वेळी चैतन्य ती माझी चूक असल्याचे सांगून मला शिरस्त्राण घालण्यास सांगतो.
इ. जर मी अधिक वेगाने गाडी चालवत असेन, तर तो लगेच मला सतर्क करतो आणि शहरात ४० कि.मी. प्रति घंटा गाडी चालवण्याचा नियम असल्याचे सांगून मला गाडीची गती न्यून करायला लावतो.
१४. कठीण प्रसंगातही स्थिर रहाणे : आजीच्या निधनाच्या वेळी आणि त्यानंतरही तो स्थिर आहे. कोणत्याही प्रसंगी तो जास्त उतावळा, आनंदी किंवा दुःखी होत नाही. प्रत्येक वेळी तो स्थिर रहातो.
१५. धर्माभिमान : बाजारातून सामान खरेदी करतांना ‘ते दुकान हिंदूचे आहे कि अन्य धर्मियांचे ?’, हे तो आधी बघतो. ‘तेथे देवतांची चित्रे लावली आहेत का ?’, याचे निरीक्षण करतो. जर ते दुकान अन्य धर्मियाचे असेल, तर तो तेथून काही खरेदी करण्यास नकार देतो.
१६. संतांप्रतीचा भाव
अ. चैतन्य सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना ‘गोव्याचे दादाजी’, असे संबोधतो. ‘त्यांना भेटण्यासाठी आपण गोव्याला कधी जायचे ?’, असे तो सतत विचारतो.
आ. चैतन्यच्या आजीच्या निधनानंतर आमच्या घरी सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे) आले होते. त्यांना भेटण्यासाठी चैतन्य पुष्कळ उत्साही होता आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी घराच्या तळमजल्यावर जाऊन उभा राहिला. (आम्ही चौथ्या मजल्यावर रहातो.)’
– श्री. बी.भी. कृष्णा (बी. चैतन्य याचे वडील), जमशेदपूर, झारखंड. (२९.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.