Maldives Defence Minister Confession : भारतीय विमाने चालवण्याची क्षमता असलेला एकही वैमानिक मालदीवकडे नाही !

मालदीवचे संरक्षणमंत्री घसान मौमून यांनी दिली स्वीकृती !

माले (मालदीव) – मालदीवचे संरक्षणमंत्री घसान मौमून यांनी भारताकडून मिळालेली विमाने चालवण्यासाठी त्यांच्या सैन्यामध्ये एकही सक्षम वैमानिक नसल्याचे मान्य केले आहे. येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत मौमून यांनी ही माहिती दिली. मौमून म्हणाले की, मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाकडे भारताकडून भेट म्हणून मिळालेली २ हेलिकॉप्टर आणि १ डॉर्नियर विमान उडवू शकेल, असा कुणीही नाही.

१. विशेष म्हणजे भारतीय सैनिकांनी मालदीवच्या संरक्षण दलाच्या सैनिकांना या विमानांचे प्रशिक्षण दिले होते; परंतु त्यांच्यापैकी कुणीही प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण करू शकले नाही.

२. दुसरीकडे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी दिलेल्या मुदतीपूर्वीच भारताने त्याचे सर्व सैनिक माघारी बोलावले आहेत. आता भारतीय वैमानिकांची जागा भारतीय नागरी कर्मचार्‍यांनी घेतली आहे.

३. गंमत अशी की, मइज्जू सरकारचे नेते जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा ते भारतीय सैनिकांवरून आधीच्या सरकारांवर टीका करायचे. ‘मालदीव सैन्यात सक्षम वैमानिक आहेत. तरीही (तत्कालीन) मालदीव सरकार भारतीय सैनिकांना मालदीवमध्ये येण्याचे निमंत्रण देते’, असा मुइज्जू आणि त्यांचे समर्थक दावा करत असत.

४. भारताने वर्ष २०१० आणि २०१३ मध्ये मालदीवला २ हेलिकॉप्टर अन् वर्ष २०२० मध्ये एक लहान विमान भेट दिले होते. यावरून मालदीवमध्ये मोठा गदारोळ झाला होता. मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी तत्कालीन राष्ट्रपती सोलिह यांच्यावर टीका करत, ‘या सरकारने ‘इंडिया फर्स्ट’ (भारत प्रथम) धोरण अवलंबले आहे’, असा आरोप केला होता.

संपादकीय भूमिका

  • भारताने आता चीनधार्जिण्या मालदीव सरकारची जिरवली पाहिजे !
  • अशा घटनांतून मालदीव सैन्य किती ‘सक्षम’ आहे, हे स्पष्ट होते. भारताने आता व्यूहरचना करून मालदीवला स्वत:च्या गटात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !