China Naval Dock : बांगलादेशमध्ये चीनने उभारला नौदल तळ !

ढाका – बांगलादेशमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे. चीनच्या साहाय्याने बांगलादेशमध्ये पाणबुड्या आणि युद्धनौका यांच्यासाठी नौदल तळ उभारण्यात आला आहे. ‘इंटेल लॅब’चे जागतिक गुप्तचर संशोधन नेटवर्कचे संशोधक डॅमियन सायमन यांनी सांगितले की, चीनच्या या प्रगत संरक्षण सहकार्याच्या प्रयत्नामुळे बीजिंगला बांगलादेशमध्ये त्याचे अस्तित्व बळकट करण्यास साहाय्य होईल. या प्रदेशात चीनच्या वाढत्या उपस्थितीविषयी भारताने सावध रहावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या नौदल तळामुळे चीन केवळ बांगलादेशशी संरक्षण संबंध वाढवणार नाही, तर बंगालच्या उपसागरात त्याच्या पाणबुड्यांना नवीन तळही मिळवणार आहे.

भारतासाठी चिंतेचा विषय !

भारत पारंपरिकपणे हिंद महासागर क्षेत्राकडे त्याचा प्रभाव क्षेत्र म्हणून पहातो; परंतु गेल्या काही वर्षांत चीनने या प्रदेशावर त्याचा प्रभाव वाढवला आहे. चीनच्या सैन्यदलाच्या  शिष्टमंडळाने या वर्षी मालदीव तसेच श्रीलंका आणि नेपाळ या देशांना भेट दिली. या वर्षात दोनदा भारताच्या किनार्‍याजवळ चिनी संशोधन नौका आढळून आल्या आहेत. या परिसरात चीन भारताच्या सैन्यदलाविषयी गोपनीय माहिती गोळा करत असल्याची चिंता निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

या नौदल तळाच्या आडून चीन भारताला शह देण्याचा प्रयत्न करणार, हे निश्‍चित ! चीनला वठणीवर आणायचे असेल, तर भारताने युद्धसज्ज होऊन त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !