सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !
सावंतवाडी : मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा परिणाम वन्य प्राण्यांना खाद्यासह मुख्यत्वेकरून पाणी मिळण्यावर होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी लोकवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर पर्याय म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या क्षेत्रात ३५ ठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत.
सध्या वन्य प्राण्यांचे मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दोडामार्ग तालुक्यात हत्ती, तर जिल्ह्यात अन्यत्र गवारेड्यांसह अन्य वन्य प्राण्यांचे प्रमाण आहे. वन्य प्राणी शेती, बागायती यांची हानी करतातच त्यासह मनुष्यवस्तीत आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्राण्यांना रोखण्यासाठी पर्याय म्हणून तालुक्यातील नरेंद्र डोंगर, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, तांबुळी, कोलगाव, माजगाव, इन्सुली, कुणकेरी आदी जंगलमय भागात पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत, तर काही पाणवठ्यांची खोली वाढवण्यात आली आहे. वन विभागाच्या पुढाकाराने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.