मानवजातीला लाजवणारे कर्नाटकातील ‘सेक्स स्कँडल’ !
१. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते प्रज्वल रेवण्णावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
‘कर्नाटकमध्ये हासन लोकसभा मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा गौडा उमेदवार होते. ते माजी मंत्री एच्.डी. रेवण्णा यांचे पुत्र, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुतणे आणि माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. हासन येथील लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. तेथील मतदानाच्या काही दिवसांपूर्वी प्रज्वल रेवण्णा यांनी अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्यासंदर्भातील ‘पेन ड्राईव्ह’, छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफीती मतदारांच्या घराघरात पोचवण्यात आल्या. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
दुर्दैवाची गोष्ट, म्हणजे २ सहस्र ९७६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाले; पण कुणीही समोर येऊन तक्रार द्यायला धजावत नव्हते. एक तर ‘एवढ्या मोठ्या राजकारण्याविरुद्ध पोलीस अन्वेषण करतील का ? आणि न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरण सिद्ध होईल का ?’, अशी कारणे त्यामागे होती. यासमवेतच मानहानीच्या भीतीनेही महिलांनी तक्रारी केल्या नाहीत. या परिस्थितीत एक वृद्ध महिला थेट मुख्यमंत्र्यांना भेटली आणि तिने तिच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार केली. यासमवेतच ग्रामीण स्तरावरील राजकारणात कार्यरत असणार्या एका महिलेनेही तक्रार दिली. त्यानंतर काही समाजसेविका महिला आयोगाकडे तक्रार घेऊन गेल्या. या तक्रारीची कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नोंद घेतली आणि त्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
२. प्रज्वल रेवण्णाच्या वाहनचालकामुळे महिलांवरील अत्याचार उघड
हा सर्व प्रकार माजी पंतप्रधान देवेगौडा यांना जे शासकीय निवासस्थान मिळालेले आहे त्यात घडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे निवासस्थान जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर आहे. याचा अर्थ अनुमाने ३ सहस्र महिलांवर लैंगिक छळ झाला आणि तो पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाला, असा अर्थ काढला, तर वावगे ठरणार नाही. हा सर्व प्रकार प्रज्वल रेवण्णा यांचा वाहनचालक कार्तिक गौडा याला माहिती होता. प्रज्वल यांनी त्याच्यावर अत्याचार केले, तसेच त्याच्या गर्भवती पत्नीलाही मारहाण केली होती. त्यानंतर त्याने महिलांवरील अत्याचारांची छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधकांकडे पाठवल्या. विरोधकांनी त्यांना मतदारांच्या घरोघरी पोचवण्याचे काम केले.
३. प्रज्वल रेवण्णाचा मस्तवालपणा
प्रज्वल रेवण्णा यांनी पोलिसांकडे तक्रार केली की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या साहाय्याने त्याचे ‘मॉर्फड फेसेस’ (यात एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र पालटून त्या ठिकाणी दुसरे छायाचित्र लावले जाते.) करून महिलांशी लैंगिक कृत्ये करतांनाची चित्रफीत प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे असे करणार्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. त्यानंतर तो जर्मनीला पळून गेला. ३ मे या दिवशी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने एच्.डी. रेवण्णा यांच्या घरावर छापा टाकला. त्यात प्रज्वल रेवण्णाचे वडील एच्.डी. रेवण्णा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह त्यांच्या एका सहकार्यालाही अटक झाली. या सर्वांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले; मात्र न्यायालयाने जामीन नाकारला. प्रज्वल रेवण्णा हे जर्मनीत दडून बसले आहेत. त्यांनी पोलिसांसमोर उपस्थित व्हावे, असा त्यांच्याकडे निरोप पाठवण्यात आला; मात्र आज इतके दिवस होऊनही ते भारतात परतलेले नाहीत, तसेच ते अन्वेषण यंत्रणाना सहकार्यही करत नाही.
४. रेवण्णाला कठोरात कठोर शिक्षा मिळणे आवश्यक !
प्रज्वल रेवण्णा यांनी पीडित महिलांवरील लैंगिक छळाचे छायाचित्रण केले आणि त्याच्या चित्रफिती स्वत:जवळ ठेवल्या. यातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. या चित्रफिती अनेक राजकारण्यांकडे होत्या. या प्रकरणातील पीडित महिलांपैकी अनेक जणी घरेदारे सोडून निघून गेल्या आहेत. सध्या रेवण्णाच्या विरोधात पोलिसांनी ‘लूक आऊट नोटीस’ (दिसताच क्षणी अटक करण्याचे आदेश) आणि ‘ब्लू कलर नोटीस’ पाठवली आहे. ‘ब्लू कलर नोटीस’मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या व्यक्तीचे अन्वेषण करता येते. या व्यक्तीची ओळख जगभरात करून दिली जाते. त्यामुळे त्याला भारतात आणणे सोपे जाते.
कलंकित राजकारण्यांच्या विरुद्धचे खटले विशेष न्यायालयात चालवून त्यांचे लवकरात लवकर निवाडे लागावे, याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत. असे असतांनाही ही मंडळी पिढ्यान्पिढ्या निवडून येतात. अनेक दशके त्यांच्या विरुद्ध आरोप असतांनाही ते निवडून येऊन सत्ता उपभोगतात. ज्या पद्धतीने प्रज्वल रेवण्णाच्या वाहनचालकाने अत्याचार उघड केला, त्याच पद्धतीने काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या संदर्भातील अश्लील चित्रफीत त्यांच्या वाहनचालकाने पोलिसांकडे दिल्या होत्या. सिंघवी यांची चौकशी किंवा अन्य काही पुढे झाले नाही. आज ते दिमाखात सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात, तसेच काँग्रेसचे नेते म्हणून समाजात मिरवतात. ‘प्रज्वल रेवण्णाच्या संदर्भात असे होऊ नये, त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला करून त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट’ आणि अन्य कायद्यांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करून अशा व्यक्तींची स्थावर अन् जंगम मालमत्ता कह्यात घेऊन ती पीडितांमध्ये वाटावी. यासमवेतच अशा व्यक्तीला आजन्म कारागृहात डांबले पाहिजे आणि त्याला कोणतीही निवडणूक लढण्यावर बंदी घातली पाहिजे.
५. काळाच्या ओघात ही घटनाही जनतेच्या विस्मृतीत जाईल !
लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत हा विषय चर्चेला जाईल. त्यानंतर पुन्हा न्यायालयात ‘तारीख पे तारीख’, असे करत खटला चालू राहील. सामान्य जनता हे सर्व विसरून जाईल; कारण जनतेची स्मरणशक्ती फारच थोडी असते. प्रतिदिन असे एकाहून एक गुन्हे घडत असतात. त्यामुळे मागे घडून गेलेल्या घटनांचा विसर पडतो. नाही तरी अशी कुकृत्ये करणार्या व्यक्तींची आठवण काढून समाजाचे काय भले होणार आहे ? या प्रकरणामुळे पीडित महिलांना समाजात, तसेच त्यांच्या नातेवाइकांसमोर तोंड दाखवणे अवघड झाले आहे. अशी प्रकरणे परत घडू नयेत; म्हणून प्रज्वल रेवण्णा यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची भावना आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (८.५.२०२४)