आपली कुटुंबव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

जे प्रश्न समष्टी जीवनात निर्माण झाले, तीच मानसिकता व्यक्ती जीवनात आली की, त्या कुटुंबाचे स्वास्थ्य-सुरक्षा बाधित होते. कुटुंबव्यवस्था उध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन असमाधानी असुरक्षित बनत जाते. काही समृद्ध अशा विदेशी समाजामध्ये याची जाणीव आता व्हायला लागली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. स्त्रीवर कुटुंबाच्या स्वास्थ्याच्या रक्षणाचे दायित्व

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आपल्या धर्मामध्ये कुटुंबाच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थेचे उत्तरदायित्व मुख्यतः कुटुंबातील गृहिणीवर आहे. आज स्त्रीमुक्तीच्या भ्रामक विचारांच्या वावटळीत हे समजणे अवघड आणि कदाचित अशक्य वाटत असेल; पण ‘गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ।’ म्हणजे ‘गृहिणीविना असलेले घर हे जणू वनाप्रमाणे असते.’ असे का म्हटले आहे ? ते लक्षात घेतले पाहिजे. स्त्री जीवनाची आणि स्त्रीला पतिव्रता धर्म म्हणून सांगितलेल्या धर्माची उपयुक्तता ही कुटुंबाचे स्वास्थ्य, समाधान आणि अंतर्गत संरक्षण यांसाठीच आहे.

२. कुटुंबातील सदस्यांनी आपापला धर्म पाळणे महत्त्वाचे

कर्तापुरुष सन्नितीच्या मार्गाने धनप्राप्तीला (जोडोनिया धन उत्तम व्यवहारे) बाह्य संरक्षणाला उत्तरदायी आहे. अर्थात् ‘केवळ गृहिणीवर किंवा स्त्रीवरच सर्व दायित्व आहे’, असा अर्थ नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपापले धर्म, पिता धर्म-माता धर्म-पुत्र धर्म-पुत्री धर्म- भ्रातृ धर्म, गृहस्थ धर्म, वृद्ध ज्येष्ठांसाठी वानप्रस्थ धर्म नेटकेपणाने सांभाळले पाहिजेत आणि सांभाळण्यासाठी आधी नीट समजून घेतले पाहिजेत.

३. भारतीय कुटुंबव्यवस्थेत कुटुंबियांनी ठेवायची जाण

आपल्याकडच्या पूर्वीच्या कुटुंबव्यवस्थेत ज्येष्ठ वृद्ध सदस्य (आजोबा, आजी इत्यादी) हे आपल्या अनुभवातून प्रत्येक घटकाला त्यांचे त्यांचे आचारधर्म शिकवत असत. कदाचित कुणी चूक केली, तर वत्सलतेने क्षमाशीलवृत्तीने समजून घेत असत आणि ‘पुन्हा तसे होणार नाही’, याची काळजी घेण्यास सांगत असत. नेमके काय चुकले ? तेही स्पष्ट करत असत. आज पाश्चात्त्य जीवनपद्धतीच्या भ्रामक आकर्षणाने आपण ही व्यवस्था मोडित काढल्यासारखी आहे. काही चुकीचे तर्क कुटुंबाला स्वास्थ्यापासून दूर नेतात. यासाठी धर्माच्या ‘विशेष अधिकार आणि उत्तरदायित्व’ या दोन अंगांसह ‘कर्तव्य अन् सन्निती’ या उरलेल्या दोन गोष्टींची जाण ठेवली, तर काय योग्य आणि काय चूक ? याचा निर्णय करता येतो. त्याने कुटुंब समाधानी आणि स्वस्थ होते.

दुःखाने माणसाचे समाधान कमी होईल यात आश्चर्य नाही; परंतु विचार केला, तर केवळ सुखाने माणूस समाधानी बनत नाही, हे लक्षात येईल. जसजसे सुख मिळत जाईल, माणसाची आसक्ती, हाव वाढत जाते आणि परिणामी तो असमाधानी बनतो. स्वास्थ्य-आनंद घालवून बसतो. मनुष्य आपले सर्व व्यवहार करतो ते समाधानाच्या प्राप्तीकरता. त्यालाच तो सुख समजत असतो. सार्वत्रिक अनुभव असा दिसतो की, मनुष्याला व्यवहारातून बरेच काही मिळते; पण समाधानच मिळत नाही.

४. अध्यात्म ज्ञानाचे महत्त्व

अध्यात्मज्ञान सुख-दुःखांची परिणती ‘आसक्ती (हर्ष-मोह) – शोक’ यांमध्ये होऊ देत नाही. त्यामुळे माणसाची समाधानी अवस्था टिकून रहाते. ज्याने अध्यात्माचे चिंतन केले आहे, काही अंशी साध्य झाले आहे. त्याचे जीवन नित्य समाधानी रहाते. अनेक संतमहात्म्यांची चरित्रे याला साक्षी आहेत. अध्यात्म ज्ञान जीवनाच्या सर्व दुःखांचे पर्यवसान शोकामध्ये होऊ देत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाचे उत्तम असे आघातपाचक (शॉक ॲब्सॉर्बर्स) रस्त्याचा खडबडीतपणा आतील प्रवाशास जाणवू देत नाहीत, त्याप्रमाणे अध्यात्म जीवनातील चढ-उतार, सुख-दु:ख यांचा माणसाच्या समाधानावर परिणाम होऊ देत नाही. तो एका दिव्य आनंदात आणि समाधानात राहू शकतो.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)