पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता काळात १३ कोटी हून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त !
पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यापासून आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख रक्कम, मद्य, सोने-चांदीसह दागिने, अमली पदार्थ आणि मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठीच्या इतर वस्तू यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. (जप्त झालेली रक्कम आणि वस्तू यांचे मूल्य एवढे आहे, तर जप्त न झालेल्या किती असतील, याची कल्पना न केलेली बरी ! – संपादक)
आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथक, पडताळणी पथक यांची नियुक्ती केली होती. या पथकांनी आतापर्यंत ४ कोटी ३४ लाख रुपये, १ कोटी ६९ लाख रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने, ४ कोटी ९ लाख रुपयांचा मद्यसाठा, १ कोटी १४ लाख रुपयांचे अमली पदार्थ अन् २ कोटी ७८ लाख रुपयांचे मतदारांना प्रलोभन दाखवणार्या वस्तू असा मिळून १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.