निर्मळ, प्रेमळ आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारून सहजतेने रहाणार्या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) !
‘मागील दीड वर्षांपासून मला पू. (श्रीमती) दातेआजींच्या खोलीत रहाण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या समवेत रहातांना मला त्यांच्याविषयी जाणवलेली आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. मनाची निर्मळता :
एकदा पू. (श्रीमती) दातेआजींना परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभणार होता. सत्संगाला जाण्यापूर्वी त्यांनी अतिशय निर्मळतेने मला विचारले, ‘‘मला भेटीत बोलता येईल ना ? मी अडखळणार नाही ना ?’’ त्यांच्या मनात ‘माझ्यापेक्षा ही पुष्कळ लहान आले. तिला कसे विचारू ?’, असा विचारच आला नाही. त्यांचे मन अतिशय निर्मळ आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद जाणवतो. त्यांच्याशी बोलतांना ‘मी लहान बाळाशीच बोलत आहे’, असे मला जाणवते.
२. नीटनेटकेपणा :
एकदा एका साधिकेने कपडे वाळत घालतांना एक कपडा नीट वाळत घातला नव्हता. तेव्हा पू. आजी तिला म्हणाल्या, ‘‘तो कपडा काढून परत नीट वाळत घाल. परम पूज्यांना असे कसेतरीच कपडे वाळत घातलेले आवडणार नाही.’’
३. वेळेचे गांभीर्य :
पू. आजींना वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नाही. एकदा दुपारचा अल्पाहार झाल्यावर पू. आजींची मोठी सून सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मी आणि सौ. संगीता चौधरी बोलत बसलो होतो. आमचे बोलणे झाल्यावर पू. आजी आम्हाला म्हणाल्या, ‘‘एक घंटा बोलत बसला आहात.’’ तेव्हा आम्ही त्यांची क्षमा मागितली.
४. परिस्थिती मनापासून स्वीकारणे
४ अ. मोठ्या बंगल्यात रहाण्याची सवय असूनही आश्रमातील एका खोलीत आनंदाने रहाणे : पू. आजी पुणे येथील त्यांच्या बंगल्यात त्यांची दोन्ही मुले (डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि श्री. निरंजन दाते), दोन्ही सुना (सौ. ज्योती नरेंद्र दाते आणि सौ. नेहा निरंजन दाते) अन् नातवंडे यांच्यासह इतकी वर्षे एका बंगल्यात एकत्रच रहात होत्या. त्यामुळे पू. आजींना कधी एकटे आणि लहान जागेत रहायची सवय नाही. वर्ष २०२२ च्या नोव्हेंबरमध्ये ज्योतीकाकूंच्या समवेत रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर त्यांनी आश्रमजीवन लगेच स्वीकारले.
४ आ. सूनेला माहेरी जायला लागल्यावर खोलीतील साधिकांसह आनंदाने रहाणे : एप्रिल २०२४ मध्ये ज्योतीकाकूंच्या आईला (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत) यांना) हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्योतीकाकूंना पुण्याला जावे लागणार होते. पू. आजींच्या वयामुळे त्यांना एवढ्या लांबचा प्रवास झेपणार नव्हता आणि तेव्हा निरंजनकाका अन् नेहाकाकू कॅनडा येथे गेले होते. या परिस्थितीतही पू. आजींनी ज्योतीकाकूंना पुण्याला जायची अनुमती दिली. त्या ज्योतीकाकूंना म्हणाल्या, ‘‘यायची घाई करू नकोस. ८ – १५ दिवस रहा.’’ एवढ्या वयातही त्या आम्हा साधिकांच्या समवेत ३ – ४ दिवस आनंदाने राहिल्या. या वयात एवढे स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. त्या संत असल्यानेच ती परिस्थिती स्वीकारू शकल्या. मी अधूनमधून त्यांना विचारत असे, ‘‘कुटुंबियांपैकी कुणाशी बोलायचे आहे का ? भ्रमणभाष लावून देऊ का ?’’ तेव्हा त्या ‘‘नको’’ म्हणायच्या. त्यांनी एकदाही कुटुंबियांची आठवण आली; म्हणून त्यांना भ्रमणभाष लावून द्यायला सांगितला नाही. त्यांच्या मुलांचे त्यांना भ्रमणभाष आल्यावरच त्या त्यांच्याशी बोलायच्या.’
५. प्रीती
अ. मी भूमीवर केवळ चटई आणि त्यावर एक पातळ गोधडी घालून झोपत होते. तेव्हा हिवाळा चालू होता. पू. आजी २ – ३ वेळा मला म्हणाल्या, ‘‘तू भूमीवर झोपतेस, ते मला कसेतरीच वाटते. मी तुझ्यासाठी गादी मागवू का ? साधकांना सांगितल्यावर ते लगेच गादी आणून देतील.’’ त्यांची ती प्रीती पाहून मी जाड गोधडी आणून घेऊन त्यावर झोपू लागले.
आ. एकदा रात्री मी एका हाताला मेंदी लावली होती. त्यामुळे रात्री झोपतांना मी मेंदी न लावलेल्या एका हाताने पांघरूण घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा पू. आजींनी ज्योतीकाकूंना माझ्या अंगावर पांघरूण घालायला सांगितले.
इ. पू. आजी कुठलाही खाऊ खातांना मी खोलीत नसले, तर त्या ज्योतीकाकूंना माझ्यासाठी तो पदार्थ काढून ठेवायला सांगतात आणि मी खोलीत आल्यावर आठवणीने मला देतात.
६. इतरांचा विचार करणे
अ. ज्योतीकाकू स्वतःचे आणि पू. आजींचे कपडे वाळत घालतांना पू. आजी त्यांना नेहमी सांगतात, ‘तृप्तीला कपडे वाळत घालायला जागा राहू दे’ आणि मला म्हणतात, ‘‘तुला कपडे वाळत घालायला जागा नसेल, तर माझे वाळत घातलेले कपडे काढलेस, तरी चालेल.’’
७. आज्ञापालन करतांनाही इतरांचा विचार करणे :
महर्षींनी सकाळी उठल्यावर प्रतिदिन एक मंत्र म्हणायला सांगितला आहे. पू. आजींनी तो मंत्र कागदावर लिहून घेतला आहे. महर्षींनी सांगितलेल्या दिवसापासून पू. आजींनी प्रतिदिन तो मंत्र म्हणायला आरंभ केला आहे. त्या प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठतात. ‘तो मंत्र म्हणतांना आमची झोपमोड होऊ नये’, यासाठी त्या खोलीच्या बाहेर असलेल्या हस्तप्रक्षालनपात्राजवळील दिवा लावून तिथे तो मंत्र म्हणतात.
८. अखंड अनुसंधानात रहाणे :
खोलीत आम्ही साधिका बोलत असलो, तरी पू. आजींचे आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यांना सध्या ऐकू येणे न्यून झाले आहे. असे असूनही ‘आम्ही काय बोलत आहोत, हे स्वतःला कळायला हवे’, अशी त्यांची अजिबात अपेक्षा नसते. त्या शांतपणे ‘नारायण’, ‘नारायण’, असा नामजप करत बसतात.
९. कृतज्ञता :
‘गुरुकृपेनेच मला अशा प्रेमळ पू. आजींचा सहवास मिळाला’, यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२४)
पू. दातेआजींच्या सेवेत एकरूप झालेल्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती नरेंद्र दाते (वय ५९ वर्षे) !१. पू. दातेआजींशी ‘संत’ या भावानेच वागणे :सौ. ज्योतीकाकूंचा पू. आजींप्रती पुष्कळ भाव आहे. एकदा ज्योतीकाकू मला म्हणाल्या, ‘‘त्या माझ्या सासूबाई आहेत, हे मी कधीच विसरले आहे. मी त्यांच्याकडे ‘संत’ या भावानेच बघते; पण कधी कधी माझा तेवढा भाव रहात नाही. देवाने मला एवढा मौल्यवान ठेवा सांभाळण्यासाठी दिला आहे; पण मीच न्यून पडते.’’ २. घेतलेला पोशाख पू. दातेआजींना न आवडल्यावर लगेच परत करणे :एकदा कपड्यांचे प्रदर्शन लागले असतांना त्यातील एक पोशाख ज्योतीकाकूंना आवडला. त्यांनी तो विकत घेतला. खोलीत आल्यावर त्यांनी तो पोशाख पू. आजींना दाखवला; पण पू. आजींना तो आवडला नाही. तेव्हा ज्योतीकाकूंनी तो लगेच परत केला. – कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२४) |
पू. दातेआजींचे आदर्श कुटुंब आणि पू. दातेआजींची जीवनाविषयीची अनासक्ती ! :सौ. ज्योतीकाकूंप्रमाणेच सौ. नेहाकाकूही पू. आजींची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतात. पू. आजींचे दोन्ही सुनांवर आणि त्या दोघींचे पू. आजींवर पुष्कळ प्रेम आहे. पू. आजी सांगतील, तसेच त्या दोघीही वागतात. त्या दोघींविषयी प.पू. डॉक्टर एकदा पू. आजींना म्हणाले, ‘‘तुम्हाला दोन्ही सुना चांगल्या मिळाल्या ना ? पुढच्या जन्मीही तुम्हाला अशाच सुना मिळू देत.’’ तेव्हा पू. आजी त्यांना म्हणाल्या, ‘‘मला पुढचा जन्मच नको.’’ – कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२४) |