जामसंडे आणि देवगड शहरांत नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ !
पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कोलमडल्याने पाणीटंचाई
देवगड – वाढलेली उष्णता आणि भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याचा अधिक फटका जामसंडे आणि देवगड शहरांना बसत आहे. शहरातील विंधन विहिरी (बोअरवेल) आणि साध्या विहिरी यांची पाण्याची पातळी खालावलेली असतांनाच जामसंडे आणि देवगड येथे पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच कोलमडल्याने आता या शहरवासियांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे.
वाढलेल्या उष्णतेमुळे जामसंडे आणि देवगड या शहरांना पाणीपुरवठा करणार्या दहिबांव येथील जलस्रोतातील पाण्याची पातळी घटली आहे. अशी स्थिती असतांना नळयोजनेची जलवाहिनी कधी फुटते, तर कधी उद्भव केंद्रातील (पंपींग स्टेशनमधील) यंत्रणा बिघडते. त्यामुळे या-ना त्या कारणाने पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होते.
सध्या या नळयोजनेची जलवाहिनी फुटली आहे. त्यातच आता ‘पंपींग स्टेशन’मध्येही बिघाड झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम स्थानिक पातळीवर करण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र पंपींग स्टेशनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी कोल्हापूर येथून तज्ञांना बोलवावे लागते. त्यामुळे कोल्हापूर येथून तज्ञ आल्यानंतरच ‘पंपींग स्टेशन’मधील बिघाड दूर होणार आहे. जलवाहिनी स्थानिक पातळीवर दुरुस्त झाली, तरी ‘पंपींग स्टेशन’मधील बिघाड दूर न झाल्यास काहीच लाभ होणार नाही. प्रतिवर्षी उद्भवणारी ही समस्या असल्याने प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढावी, अशी मागणी केली जात आहे.