रेल्वेत हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने रेल्वे सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या सतर्कतेमुळे सापडले !
थिवी – जोगेश्वरी येथील वीरेंद्र खाडे त्यांच्या पत्नीसह वसई येथे मांडवी एक्सप्रेस ही गोव्याला येणारी रेल्वे पकडून राजापूर येथे आले. ते सामान्य डब्यातून प्रवास करत होते. राजापूर येथे उतरल्यानंतर काही वेळाने त्यांची पत्नी सोन्याचे दागिने असलेली बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. तोपर्यंत रेल्वे पुढील प्रवासाला गेली होती. याविषयी खाडे यांनी तातडीने रेल्वेस्थानक मास्तरांना गाठून त्यांना घटना सांगितली. रेल्वेस्थानक मास्तरांनी तातडीने थिवी येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकडीला याची माहिती दिली. सुरक्षादलाच्या सैनिकांनी ती बॅग शोधून काढली. त्यानंतर वीरेंद्र खाडे दुसर्या गाडीने थिवी येथे आले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीला सर्व दागिने दाखवून त्याची ओळख पटवली. मधल्या कालावधीत कणकवली येथेही सुरक्षादलाच्या सैनिकांना रेल्वेत बॅग तपासण्याविषयी सांगितले; पण त्यांनी कोणतीही बॅग सापडली नाही, असे कळवले. या बॅगेत ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, एकूण ४ तोळे सोन्याच्या ४ बांगड्या, ३ तोळे सोन्याचा हार, एकूण ३ तोळे ५ ग्रॅम सोन्याच्या ४ सोनसाखळ्या आणि अन्य सोन्याचे दागिने होते.