शिरपूरच्या जैन मंदिरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन यांच्यात हाणामारी !
मूर्तीपूजनाच्या सूत्रावरून वाद होणे अपेक्षित नाही !
वाशिम – जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात ११ मे या दिवशी पुन्हा एकदा मूर्तीपूजनावरून वाद झाला. दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन यांचे भक्त अन् महाराज यांच्यात हा वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात काही भाविक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असून अद्याप या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली नाही. मुख्य भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती पूजनाच्या वेळेवरून हा वाद झाल्याचे समजते.
१ मे या दिवशीही असाच प्रकार घडला होता; पण त्या प्रकरणी कोणतीही तक्रार प्रविष्ट न झाल्याने कुठलीही कारवाई झाली नाही. ११ मे या दिवशी भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून श्वेतांबर जैनांकडून ही मारहाण केल्याचा आरोप दिगंबर जैनांनी केला आहे.