ऑस्ट्रेलियातील सौ. सोहा देव यांना ‘निर्विचार’ नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चित्र पाहून मनातील विचारांमध्ये घट होणे
‘१४.५.२०२१ या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना माझे लक्ष सूचनेच्या एका चौकटीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले. (साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप करावा’, या संदर्भात ती सूचना होती.) सूचना वाचण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पहात असतांना काही वेळ माझ्या मनातील विचारांमध्ये घट झाली आणि मला हलकेपणा जाणवून आतून शांत वाटू लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अन्य छायाचित्रे पाहिल्यावर भाव, प्रीती आणि आनंदाची अनुभूती येते; मात्र त्या दिवशी मला लगेच शांत वाटले.
२. प्रयोग म्हणून ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर चित्त आणि दृष्टी तेजतत्त्वाकडे केंद्रित होणे, सूर्यदेव आणि त्यांच्या भोवती असलेल्या आभामंडळाकडे पाहून नामजप होऊ लागणे अन् सूर्यदेवांनी त्यांच्या शीतल आत्मस्वरूपाचे दर्शन देणे
त्यानंतर एक घंट्याने मी आकाशतत्त्वाचे उपाय करू लागले. त्या वेळी ‘निर्विचार’ हा नामजप किमान १५ मिनिटे केल्यावर कसे वाटते ?’, असा प्रयोग करण्याचा विचार माझ्या मनात आला. मी प्रयोग म्हणून ‘निर्विचार’ हा नामजप चालू केल्यावर माझे चित्त आणि दृष्टी आकाशतत्त्वाकडून आपोआप आकाशातील तेजतत्त्वाकडे केंद्रित झाली. त्यानंतर माझा सूर्यदेव आणि त्यांच्या भोवती असलेल्या आभामंडळाकडे पाहून नामजप होऊ लागला. हा नवीन नामजप असूनही चांगला होत होता. काही वेळाने मी डोळे मिटून नामजप करू लागले. प्रारंभी मला सूर्याची उष्णता जाणवत होती. त्यानंतर मला सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्र यांच्यावर संवेदना जाणवू लागल्या आणि संपूर्ण शरिरात शीतलता जाणवली. मला मिटलेल्या डोळ्यांपुढे पांढर्या रंगाचा मंद प्रकाश दिसत होता. त्या वेळी माझ्या मनात अन्य अनावश्यक विचार नव्हते आणि वातावरणात उष्णता असूनही मला आतून गारवा जाणवत होता. ‘बाह्यतः उग्रतेज धारण करणार्या सूर्यदेवांनी मला त्यांच्या शीतल आत्मस्वरूपाचे दर्शन घडवले. ही अनुभूती मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे आली. त्यामुळे मी सूर्यदेव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
३. घरातील ट्रॉलीच्या एका चाकाकडे पाहून ‘निर्विचार’ हा जप केल्यावर ते कालचक्र असल्याचे भासणे आणि चाकाभोवती पांढरे आभामंडळ दिसून नामजप एकाग्रतेने होणे
२४.६.२०२१ या दिवशी सकाळी मी (घरात बसून बाहेर) आकाशाकडे पहात ‘निर्विचार’ हा नामजप करत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘एखाद्या वस्तूकडे पाहून नामजप करूया’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझी दृष्टी घरातील ट्रॉलीवर पडली. त्या ‘ट्रॉली’ला असणार्या काळ्या रंगांच्या चाकांपैकी एका चाकाकडे पहात मी नामजप करू लागले. काही वेळाने ‘ते चाक म्हणजे कालचक्रच (समयचक्रच) आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर त्या चाकाभोवती मला पांढरे आभामंडळ दिसू लागले. ते वलय वाढले आणि चाकाचे अस्तित्व नाहीसे झाल्याचे मला जाणवले. त्या पांढर्या आभामंडळाकडे पाहून माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.
४. कालचक्राच्या आभामंडळाच्या ठिकाणी पोकळी निर्माण झाल्याचे सूक्ष्मातून दिसणे आणि स्वतःमध्येही पोकळी निर्माण झाल्याची जाणीव होणे
काही वेळाने मला त्या आभामंडळाच्या ठिकाणी पोकळी निर्माण झाल्याचे सूक्ष्मातून दिसले. माझी एकाग्रता आणखी वाढली. त्या वेळी ‘माझा नामजप होत आहे कि नाही ?’, याची मला काहीच जाणीव झाली नाही. ही अनुभूती केवळ ५ ते १० मिनिटे आली. त्यानंतर पुष्कळ वेळ नामजप झाला नाही किंवा माझ्या मनात विचारही आले नाहीत. मला आतून पोकळ झाल्याची जाणीव होत होती.’
– सौ. सोहा देव, सिडनी, ऑस्ट्रेलिया.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |