Macular Degeneration:वर्ष २०४० पर्यंत किमान ३० कोटी लोकांना होऊ शकतात डोळ्यांचे गंभीर आजार !
|
नवी देहली – डोळ्यांशी संबंधित आजारांच्या धोक्यांसंदर्भात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आरोग्यतज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तज्ञांनी सांगितले की, आपली जीवनशैली ज्याप्रकारे विस्कळीत होत आहे, त्यामुळे वर्ष २०४० पर्यंत ३० कोटींहून अधिक लोकांना ‘वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन’चा धोका असण्याची शक्यता आहे. हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते. शक्यतो हा रोग वयाची पन्नाशी उलटल्यावर होतो किंवा अनुवांशिकतेमुळेही होऊ शकतो. सध्या जगभरात २० कोटींहून अधिक लोक या समस्येचे बळी आहेत.
जेव्हा तुमच्या डोळ्यातील रेटिनाचा (डोळ्यातील एक महत्त्वपूर्ण अवयव) मध्य भाग (याला ‘मॅक्युला’ म्हणतात) खराब होतो, तेव्हा असे होते. नेत्ररोगतज्ञ मार्को अलेजांद्रो गोन्झालेझ म्हणतात, ‘या समस्येसाठी अनेक कारणे उत्तरदायी असल्याचे आढळून आले आहे. डोळ्यांशी संबंधित या आजाराची लक्षणे आणि कारणे समजून घेणे अन् हा विकार रोखण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.’
आजार न होण्यासाठी असे प्रयत्न करा !
१. संशोधकांनी सांगितले की, धुम्रपान, उच्च रक्तदाब किंवा ‘कोलेस्टेरॉल’ची समस्या, जास्त ‘सॅच्युरेटेड फॅट’चे सेवन, लठ्ठपणा इत्यादी परिस्थितींमुळे या डोळ्यांच्या आजाराचा धोका वाढू शकतो. ‘सॅच्युरेटेड फॅट’ हे प्रामुख्याने ‘चीज’, ‘बटर’, बीफ (गोमांस), ‘पेस्ट्री’, खोबरेल तेल, चॉकलेट, आईसस्क्रीम यांमध्ये अधिक असतात.
२. या आजारावर कोणताही उपचार नाही. त्याची लक्षणे कमी करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.
३. उच्च रक्तदाब असल्यास काळजी घ्या. तुमचे वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा.
४. प्रतिदिनच्या अशा सवयी डोळ्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.