‘पतंजलि योगपीठ’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आय.एम्.ए.)च्या वादात आयुर्वेदाची हानी होऊ देऊ नका !
आयुष मंत्रालयाला अनावृत्तपत्र
सध्या सर्वत्र ‘पतंजलि योगपिठा’ने सिद्ध केलेल्या काही औषधांवर बंदी घालण्यासंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, म्हणजेच ‘आय.एम्.ए.’ने सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका आणि त्यावर न्यायालयाने निर्णय देत असतांनाच केलेली विधाने याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. या चर्चांच्या मुळाशी जाऊन तथ्य शोधून काढणे ? ‘खरे कोण ? खोटे कोण ?’ हे सिद्ध करणे, हा या पत्राचा उद्देश नाही; परंतु या चर्चांमध्ये ‘स्वतःचे मन भरकटून मूळ विचारांपासून दूर जाऊ नये, या वादग्रस्त प्रकरणाविषयी योग्य ते चिंतन-मनन होऊन आपण स्वतः त्याविषयी योग्य निर्णयापर्यंत पोचणे आवश्यक आहे’, यासाठी हे पत्र आपणास लिहीत आहे.
१. रुग्णांचे विचारस्वातंत्र्य आणि सर्वसामान्यांची स्थिती
आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचे समर्थक यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. प्रत्येकाला आपापले क्षेत्र अधिक उपयुक्त आणि तेच सर्वश्रेष्ठ आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे. याविषयी आमचा अधिक अभ्यास नसल्याने त्याविषयी भाष्य करणे अधिक धाडसाचे ठरेल; परंतु ‘माझे क्षेत्र सर्वश्रेष्ठ’, असे मानत असतांनाच इतरांना कमी लेखणे किंवा ‘ते शास्त्र निरर्थक आहे’, असे समजणे हेही शास्त्रशुद्ध आणि समर्थनीय ठरणार नाही. त्यामुळे रुग्णांना ज्या उपचार पद्धतीने बरे वाटते ती पद्धत घेण्याचे विचारस्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला आहे आणि त्यांनी त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्या त्या उपचारपद्धतीने स्वतःवर उपचार करून घ्यावेत; मात्र या ठिकाणी जेव्हा असे वादाचे प्रसंग निर्माण होतात, तेव्हा उपचार करून घेणार्याच्या मनातही विकल्प निर्माण होतो. हा विकल्प दूर करणे आणि योग्य दिशा दर्शन करणे, हे त्या त्या क्षेत्रातील विद्वानांनी करणे आवश्यक आहे अन्यथा सामान्य माणूस यात भरडला जातो.
२. सरकारकडून नियमावली हवी !
येथे सर्वांत महत्त्वाचा विषय चर्चिला गेला, तो म्हणजे ‘पतंजली’ने केलेले विज्ञापन ! आता जेव्हा याच प्रश्नाविषयी आपण विचार करतो, तेव्हा ‘विज्ञापन करतांना अतिशयोक्ती केली जाते’, याविषयी कुणाचेही दुमत नसावे. ‘फेअर अँड लव्हली’, ‘लॅक्मे’, ‘संतूर साबण’, यांची विज्ञापने आपण जेव्हा बघतो, तेव्हा ‘काळा चेहरा गोरा होणे’, ‘वयस्कर व्यक्ती तरुण दिसणे’, ‘मुलांनी दाढी केल्यानंतर त्यांचा चेहरा मुलींसारखा नाजूक आणि आकर्षक दिसणे’, अशा कितीतरी गोष्टी आपण विज्ञापनांमध्ये बघतो; परंतु प्रत्यक्षात तसे होत नसते. जेव्हा ‘बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी’ (बूस्ट हेच माझ्या ऊर्जेचे रहस्य आहे) (बूस्ट ही दुधात घालून घ्यावयाची पावडर आहे.), असे जेव्हा एखादा खेळाडू सांगून मैदानात खेळत असतो, तेव्हा तो प्रत्यक्षात ती गोष्ट खरच घेत असतो का ? हाही प्रश्न आहे. त्यामुळे विज्ञापनांचा विचार करतांना त्याविषयी काही तरी नियमावली सरकारनेच घालायला हवी, जेणेकरून त्याविषयी वस्तूनिष्ठ माहिती ग्राहकाला कळेल.
३. ‘आय.एम्.ए.’चा इतिहास आणि तिचा षड्यंत्रकारी विचार (?)
आता आपण ‘आय.एम्.ए.’च्या इतिहासाविषयी पाहू. या संघटनेचा इतिहास कायमच वादग्रस्त राहिलेला आहे. जेव्हा ही संघटना ॲलोपॅथीचे समर्थन करते, तेव्हा ती आयुर्वेदाला न्यून लेखत असते, हे सर्वश्रुत आहे; परंतु ‘आयुर्वेदावर टीका करत असतांनाच ज्याप्रमाणे इतरांकडे बोट दाखवत असतांना स्वतःकडे ४ बोटे असतात’, असे न्यायालय म्हणते, तेव्हा या संघटनेने अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे; कारण ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या कंपनीने काढलेली लहान मुलांसाठीची ‘टॅलकम’ पावडर वापरल्याने त्वचेचा कर्करोग होतो, हे विदेशात किती तरी घटनांमधून सिद्ध झाले आहे. या कंपनीला त्यासाठी कोट्यवधी रुपयांची हानीभरपाईही देण्याचा आदेश त्या त्या ठिकाणच्या न्यायालयाने दिलेला आहे. असे असतांना आज अनेक औषधालयांमध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी’ची पावडर विक्रीला दिसते. याविषयी ‘आय.एम्.ए.’ कधीच आवाज उठवतांना दिसली नाही किंवा ‘ही पावडर बाजारामध्ये विक्रीला नसावी’, याविषयीचे निवेदन या संघटनेने प्रसिद्ध केलेले नाही. जेव्हा ‘फेअर अँड लव्हली’ची क्रीम लावल्यानंतर काळी व्यक्ती गोरी होते’, असे विज्ञापन केले जाते, तेव्हाही ‘काळ्या व्यक्तीला आपण न्यून लेखत आहोत आणि खरोखरच ही क्रीम लावल्याने काळी व्यक्ती गोरी होते का ?’, याची शहानिशा या संघटनेने केलेली दिसत नाही. हा झाला वैद्यकीय भाग; परंतु याच संघटनेच्या एका नामांकित डॉक्टरांनी ‘कोरोना महामारीच्या काळात येशूच्या कृपेमुळे रुग्ण बरे होत आहे’, असे एक विधान करून स्वतःचा खरा चेहरा दाखवला होता. तेव्हाच ‘आय.एम्.ए.’च्या आडून ही व्यक्ती अप्रत्यक्षरित्या धर्मांतराचे कार्य करत आहे, हे कित्येकांना लक्षात आले होते. त्यामुळे ‘पतंजली’ला समोर करून आयुर्वेदाची मुस्कटदाबी करणे आणि पश्चिमी औषधांचा मारा करून भारतीय औषधांना न्यून लेखून येथील अर्थव्यवस्था बिघडवणे, असा षड्यंत्रकारी विचार ‘आय.एम्.ए.’चा आहे का ?’, याविषयी संशोधन व्हायला हवे.
४. ‘आय.एम्.ए.’ याचाही विचार करणार का ?
येथे आम्हाला पतंजलीचे समर्थन करायचे नाही; कारण पतंजलीच्या औषधांची गुणवत्ता ‘अन्न सुरक्षा आणि औषधी प्रशासन’ यांनी पडताळल्यानंतरच त्या औषधांना मान्यता मिळाली असणार आहे. त्यामुळे याविषयी पतंजलीने केलेले विज्ञापन आणि वास्तवात होणारे उपचार यांविषयी संशोधन होईल; परंतु अन्य ॲलोपॅथी औषधांचे दुष्परिणामही समोर येत आहेत, उदाहरणार्थ नुकतेच ‘कोविशील्ड’ लस घेतल्याने हृदयविकार किंवा मेंदूचे कार्य थांबण्याचा विकार होऊ शकतो’, असेही एक संशोधन पुढे आले आणि संबंधित लसची निर्मिती करणार्या आस्थापनाने ते न्यायालयात मान्यही केले आहे. दोन-चार दशकांपूर्वी प्रत्येक गावामध्ये फार तर एक किंवा दोन दंतवैद्य असायचे. त्या वेळी ‘टूथपेस्ट’चा काळ नव्हता आणि दातांची दुखणीही तितक्या प्रमाणात नव्हती. नंतर सातत्याने दूरचित्रवाणी संचावर ‘टूथपेस्ट’ची विज्ञापने येत गेली आणि लोकांच्या वापरातील दंतमंजन दूर होऊन त्याची जागा ‘टूथपेस्ट’ने घेतली. परिणामी आज गल्लोगल्ली दंतवैद्य दिसत आहेत, तर ‘टूथपेस्ट’च्या अतीवापरामुळे दातांची दुखणी वाढली का ? याचाही अभ्यास आपण करायला हवा. ‘पतंजली’च्या विरुद्ध आवाज उठवतांना ‘आय.एम्.ए.’ने याविषयीही साकल्याने विचार करायला हवा.
५. पूर्वीपासून भारतात आयुर्वेदच होते ना ? मग…
आता रहाता राहिला प्रश्न आयुर्वेदिक औषधांचा, तर आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली एक ‘अतीउत्तम देणगी’ आहे. आयुर्वेदाला ‘पाचवा वेद’ म्हटले आहे. भारतात ॲलोपॅथी येण्यापूर्वी सर्व लोक आयुर्वेद उपचारपद्धतीचाच उपयोग करत होते. तेव्हा काही लोक आयुर्वेद उपचार घेऊन मरत होते, असे नाही; परंतु ॲलोपॅथीचा बाजार भारतावर थोपवण्यासाठी आयुर्वेदावर नेहमीच आक्रमणे केली गेली आणि ‘इन्स्टंट’चा (तात्काळ उपचार) जमाना म्हणून ॲलोपॅथीचा मारा केला गेला. स्वाभाविकपणे ‘लवकर बरे वाटते’, असा विचार करून आज सर्वसामान्य लोक ॲलोपॅथी औषधे घेतात; परंतु त्या औषधांचे दुष्परिणाम माहिती नसल्याने ते त्या औषधांना भुलतात. आयुर्वेदामुळे उपचार विलंबाने होतात, असे जरी गृहीत धरले, तरीही ‘ॲलोपॅथीच्या तुलनेत आयुर्वेदामुळे दुष्परिणाम होत नाही’, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अर्थात् याविषयी आयुर्वेदतज्ञ जाणकार अधिक अधिकाराने सांगू शकतील, तो आमचा अधिकार नाही.
एखादा रुग्ण बरा होणे न होणे; यामागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे असतात अन् या तीनही कारणांचा अभ्यास केवळ आयुर्वेदातच अधिक परिणामकारकदृष्ट्या केलेला आढळतो. त्यामुळे ‘एखादे औषध घेऊन एखादी व्यक्ती बरी झाली नाही, तर त्या वेळी सर्वस्वी औषधच कारण होत आहे’, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यातील अन्य कारणांचाही अभ्यास व्हायला हवा, हे आम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते.
६. पुढील प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्रालय देईल का ?
थोडक्यात या पत्राचा उद्देश ‘पतंजलि’ योग्य किंवा ‘आय.एम्.ए.’ चुकीचे, असे सांगण्याचा नसून या घटनेतील मूळ समाजासमोर यावे’, असे आम्हाला वाटते; कारण या घटनांमधून सर्वसामान्यांना पडणार्या पुढील प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्रालयांनीच देणे अपेक्षित आहे.
अ. आता न्यायालयाच्या आदेशावरून ‘पतंजली’च्या काही उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा या उत्पादनांना बाजारात येण्याची अनुमती मिळाली, तेव्हा सरकारी खात्यांनी या उत्पादनांची गुणवत्ता पडताळली नव्हती का ?
आ. जर या औषधी उत्पादनांना सरकारी मान्यता मिळाली होती, तर त्यासंबंधी अतिशयोक्ती करणारी विज्ञापने ‘पतंजली’कडून केली गेली, तर सरकारने स्वतःहून त्याची नोंद का घेतली नाही ?
इ. पतंजलीच्या विरुद्ध न्यायालयात गेली, त्यापूर्वी या संघटनेने संबंधित सरकारी खात्याकडे पतंजलीविरुद्ध तक्रार केली होती का ? आणि केली नसल्यास ती का केली नाही ?
ई. ‘आय.एम्.ए.’चा उद्देश जर समाजाभिमुख आणि समाजहिताचा आहे, तर तो अन्य विज्ञापनांविषयी का दिसत नाही ?
उ. ‘ॲलोपॅथी औषधांचा बाजार पतंजलीच्या आयुर्वेदाच्या उत्पादनांमुळे घसरत आहे’, या भीतीने ‘पतंजली’वर कारवाई करण्यात आली आहे का ?
ऊ. यामागे ॲलोपॅथीच्या विदेशातील औषध आस्थापनांचे षड्यंत्र आहे का ? (४.५.२०२४)
७. …या वादामागे षड्यंत्र किंवा अर्थकारण नाही ना ? याचा शोध ‘आयुष मंत्रालया’ने घेणे आवश्यक !
थोडक्यात ‘आयुष मंत्रालया’ने या प्रकरणाचा गांभीर्याने आढावा घेऊन यामागील षड्यंत्र समाजासमोर आणले पाहिजे. अन्यथा लोकांच्या मनात आयुर्वेदाच्या औषधांविषयी विकल्प निर्माण होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, तसेच ॲलोपॅथी औषधांच्या आस्थापनांचे यामागे काही षड्यंत्र किंवा अर्थकारण असल्यास त्यालाही भारतीय समाज फसू शकतो, यादृष्टीने या वादाकडे केवळ ‘पतंजलि’ आणि ‘आय.एम्.ए.’ यांतील वाद असे न पहाता ‘हे देशावरील एक प्रकारचे आक्रमण आहे’, यादृष्टीने याविषयी चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते, यासाठी हा पत्र प्रपंच !
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ समूह. (४.५.२०२४)