सत्‌शिष्याचे कल्याण 

१. चांगले होणे किंवा सुख मिळणे आणि कल्याण होणे

gurupournima

‘चांगले होणे किंवा सुख मिळणे’, हे वेगळे आणि ‘कल्याण होणे’, हे वेगळे. सुख तात्कालिक असते, तर कल्याण ही शाश्वत सुखाची प्राप्ती असते. शाश्वत किंवा चिरंतन सुखात तात्कालिक सुख समाविष्ट झालेले असूनही ते अधिक वरचे सुख आहे. शाश्वत सुख इतके वरचे आणि व्यापक आहे की, तात्कालिक सुखाची त्याला पर्वाही वाटत नाही. तात्कालिक सुखे ही सावलीप्रमाणे येतात आणि जातात; म्हणून शाश्वत सुखात स्थिर झालेला मनुष्य सावलीप्रमाणेच क्षणभंगुर सुखाची उपेक्षा करतो. इतकी उच्चावस्था खर्‍या कल्याणात अभिप्रेत आहे.

२. सत्‌शिष्याच्या कल्याणार्थ सद्गुरूंचा अवतार असणे

‘कल्याण’ ही शाश्वत सौख्यदशा तर आहेच; परंतु ती निर्मळ शांतीची अवस्था आहे आणि त्याच समवेत निखळ ज्ञानदृष्टी आहे. एवढे व्यापकत्व, विशालत्व लाभलेले कल्याण, हेच ‘कैवल्य.’ अशाच कैवल्याची सत्शिष्याला सुप्तपणे आस असते आणि ती मुक्तपणे प्रदान करण्याकरताच सद्गुरूंचा अवतार असतो. नित्यचैतन्याचा सुखद संग सोडून एक प्रकारे दुःखाला आमंत्रणे देऊन सद्गुरु मनुष्यदेहाने भूतलावर येतात, ते केवळ शिष्याच्या कल्याणार्थ, उद्धारार्थ, कैवल्यार्थ !’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)