‘देव भावाचा भुकेला आहे’, या उक्तीनुसार मंदिरात देवतेचे दर्शन घेतांना व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या भावानुसार तिला चैतन्य ग्रहण होते !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘हिंदु संस्कृतीमध्ये मंदिरांचे आणि मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेण्याला पुष्कळ महत्त्व आहे. मंदिर हे चैतन्यदायी ऊर्जेचे स्रोत मानले जाते. मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांवर तेथील चैतन्याचा परिणाम होतो. मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यावर आपल्या मनाला प्रसन्नता जाणवते आणि उत्साही वाटते.
‘व्यक्तीने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येते.
१. चाचणीतील निरीक्षणे
या प्रयोगात ४ व्यक्तींनी मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर त्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.
टीप – चाचणीतील सर्वच व्यक्तींमध्ये त्रासदायक स्पंदने आढळून आली. याचे कारण हे की, सध्याचा काळ अतिशय रज-तमप्रधान असल्याने व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांच्यावर रज-तमात्मक (त्रासदायक) स्पंदनांचे आवरण येते. या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन स्वतःवरील आवरण अधूनमधून काढणे आवश्यक आहे. आवरण काढण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करू शकतो, उदा. विभूती लावणे, स्वत:वर गोमूत्र शिंपडणे, स्तोत्र म्हणणे किंवा ऐकणे, नामजप करणे इत्यादी.
२. मंदिरात देवतेचे दर्शन घेतल्यानंतर चाचणीतील व्यक्तींच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेले परिणाम
अ. पहिल्या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
आ. दुसर्या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
इ. तिसर्या आणि चौथ्या व्यक्तींतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
निष्कर्ष : देवाचे दर्शन घेतल्यावर चाचणीतील सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले; पण त्याचे प्रमाण निरनिराळे आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेतांना व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या भावानुसार तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : चाचणीतील व्यक्तींनी देवाचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले; पण त्याचे प्रमाण निराळे आहे. अन्य व्यक्तींच्या तुलनेत दुसर्या व्यक्तीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम दिसून आला. याचे कारण हे की, दर्शन घेतांना व्यक्तीचा देवाप्रती जसा भाव असतो, त्या प्रमाणात तिला देवाचे चैतन्य ग्रहण करता येते. हे ग्रहण केलेले चैतन्य टिकवणेही आवश्यक आहे. यासाठी देवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात काही वेळ बसून अंतर्मुख होऊन देवतेचा नामजप करावा. त्यामुळे चैतन्य अधिक काळ टिकून राहील.
थोडक्यात ‘मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर व्यक्ती ज्या भावाने आणि श्रद्धेने देवाचे दर्शन घेते, त्यानुसार तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो’, हे लक्षात येते.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.३.२०२४)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
भाविकांनो, मंदिरात देवाचे दर्शन घेतांना अंतर्मुख होऊन घ्या !
‘सध्या बहुतांश मंदिर-परिसरात असे दिसून येते की, दर्शनाला येणारे बहुतांश लोक सकाम उद्देश ठेवून मंदिरात जातात. तेथे जातांना त्यांची वेशभूषा आणि केशभूषा हेही असात्त्विक असते. मंदिरात गेल्यावर दर्शनासाठी रांग असेल, तर लोक मायेतील गप्पा-गोष्टी करतांना, तसेच भ्रमणभाषवर मोठ्याने बोलतांना, त्यावरील संदेश पहातांना सर्रास आढळतात. अशा वर्तनामुळे मंदिराचे पावित्र्य अल्प होते, याचे कोणाला भान नसते. दर्शन घेतांनाही मनात मायेतील विचार चालू असतात. ‘असे केल्याने देवाचे चैतन्य ग्रहण होईल का ?’, याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. मंदिर आणि देवता हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे आपली वृत्ती अंतर्मुख करून देवाचा नामजप करत दर्शन घेणे, दर्शन घेतल्यावर मायेतील गप्पा-गोष्टी करणे टाळून नामजप करत देवाच्या अनुसंधानात रहाणे इत्यादी कृती केल्यास देवाचे चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण होऊन ते टिकून रहाते. यामुळे मंदिराचे पावित्र्यही टिकून रहाते. हे लक्षात घेऊन मंदिरात देवाचे दर्शन घेतांना अंतर्मुख होऊन घ्यावे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे (२८.३.२०२४)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : http://SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
|