हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षकांनी स्वतःच्या जीवनात झालेले पालट सांगितल्यामुळे प्रेरणा मिळून कृतीप्रवण झालेले शिबिरार्थी !
‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध जिल्ह्यांत युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गांच्या प्रशिक्षकांसाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. यातून अनेक युवकांच्या जीवनामध्ये पालट होऊन ते राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्यास प्रवृत्त झाले आहेत. काहींनी सेवा करण्याची सिद्धता दर्शवली आणि अनेक जण सेवेतील आनंद घेऊ लागले. या शिबिरांच्या माध्यमातून श्री गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी युवकांमध्ये जागृती झाली आणि त्यांच्या मनात गुरुदेवांप्रती भाव निर्माण झाला. ‘गुरुदेवांच्या कृपेने या युवकांनी साधना केल्याने झालेले पालट अनुभवलेले आहेत. ‘असा प्रत्येक कार्यकर्ता आज गुरुदेवांच्या कार्याची कीर्ती करणारा आणि हिंदु राष्ट्राचा प्रेरणादायी प्रवक्ता आहे’, असे मला वाटते. या संदर्भात शिबिरात आलेले अनुभव पुढे दिले आहेत.
१. स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला येणार्या युवकांना मार्गदर्शन करण्याविषयी झालेले चिंतन
१ अ. शिबिराला येणार्या युवकांच्या मनामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रती भाव निर्माण करणारे विषय शिबिरात घेण्याचा विचार करणे : सध्या समाजातील लोकांना प्रेरणा देणार्या प्रवक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची उत्सुकता असते. ही संकल्पना लक्षात घेऊन आपल्या उपक्रमाच्या दृष्टीने मी चिंतन केले. माझ्या मनात ‘हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमातून जोडल्या जाणार्या युवकांना प्रोत्साहित करायला अजून काय करू शकतो ?’, असा विचार येत होता. आम्ही युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून अनेक शिबिरे घेतो. या शिबिरांमध्ये राष्ट्र, धर्म, साधना असे विविध तात्त्विक विषय घेतले जातात. त्यानंतर ‘शिबिराला येणार्या युवकांच्या मनामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रती भाव निर्माण करणारे विषय घेण्याविषयी प्रयत्न करावे’, असे मला वाटले.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सहस्रो साधकांच्या जीवनामध्ये पालट होणे आणि त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी त्याग करणे : गुरुदेवांच्या कृपेने आजपर्यंत सहस्रो कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये पालट झाले आहेत. कार्यकर्त्यांनी योग्य प्रकारे साधना केल्यामुळे त्यांना घरगुती आणि व्यावहारिक अडचणी असतांनाही त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी त्याग केला आहे. सहस्रो कार्यकर्ते गुरुदेवांच्या मार्गदर्शनामुळे सेवा करत आहेत. आम्ही समाजातील लोकांना संपर्क करतांना इतिहासातील राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची उदाहरणे देऊन युवकांना किंवा समाजाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्यागाचे महत्त्व सांगतो.
१ इ. शिबिरात प्रशिक्षकांनी त्यांचे अनुभव कथन करण्याचा एक विषय घेणे आणि त्याचा शिबिरार्थींना लाभ होणे : गुरुदेवांनी कार्यकर्त्यांकडून साधना करून घेतल्यामुळे अनेक साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट झाले आहेत. ते आणि त्यांचे कुटुंबीय आनंदी झाले आहे. कित्येक कार्यकर्त्यांनी आज आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी त्याग केला आहे; पण गुरुदेवांचे हे हिंदु राष्ट्राचे ध्येय आम्ही युवा कार्यकर्ते आणि समाज यांच्यासमोर मांडायला कुठेतरी अल्प पडतो. ‘साधना केल्यामुळे आमच्या स्वतःच्या जीवनात आणि आमच्या घरात झालेले पालट, व्यक्तीगत अनुभव, व्यक्तीगत प्रसंग आणि त्यामुळे जीवनाला मिळालेली दिशा, राष्ट्र आणि धर्म यासाठी कार्य करण्याची मिळालेली प्रेरणा मांडायला आम्ही कुठेतरी अल्प पडत आहोत’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर शिबिरामध्ये ‘जिल्ह्यातील जे प्रशिक्षक आहेत, त्यांचे अनुभवकथन’, असा एक विषय आम्ही शिबिरात घ्यायचे ठरवले. ‘या विषयाचा शिबिरार्थींवर पुष्कळ चांगला परिणाम झाला’, असे आम्हाला अनुभवता आले.
१ ई. प्रशिक्षकांनी त्यांच्या जीवनात झालेले पालट ठामपणे आणि मनमोकळेपणाने न सांगणे : मी अनेक प्रशिक्षकांशी बोलल्यावर लक्षात आले, ‘ते व्यक्तीगत संपर्कांमध्ये धर्मप्रेम आणि स्वतःच्या जीवनात झालेले पालट तेवढ्या ठामपणे अन् मनमोकळेपणाने सांगत नाहीत.’ त्यामुळे आम्ही समाजासमोर आपले अनुभव मांडण्यात अल्प पडतो आणि समाजही साधनेच्या दृष्टीने अनुभूती घ्यायला किंवा राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करायला उद्युक्त होण्याचे प्रमाण अल्प रहाते.
२. प्रशिक्षकांना स्वतःच्या साधनेविषयी अनुभव कथन करण्याविषयी दिशा देणे
शिबिराच्या पूर्व सत्संगामध्ये ‘अनुभवकथनाचा विषय कसा मांडावा ?’, या दृष्टीने मी प्रशिक्षकांना दिशा दिली. ‘त्यामध्ये ते स्वतःच्या जीवनात पूर्वी कसे होते ? त्यांची विचारसरणी कशी होती ? घरातील साधारण वातावरण कसे होते ? आणि ‘गुरुकृपेने साधना करू लागल्यावर जीवनात कसे पालट होत गेले ?’, असे काही प्रसंग अन् तुमच्या जीवनाला कोणत्या घटनेमुळे कलाटणी मिळाली, हे त्यांना सांगायला सांगितले. ‘काही प्रशिक्षकांना पूर्णवेळ साधना करण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली ?’ हेसुद्धा त्यांना सांगायला सांगितले. जेणेकरून शिबिरार्थींनाही त्यातून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल अन् त्यांनाही त्यांच्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी मार्ग मिळेल.
३. शिबिरात प्रशिक्षकांनी स्वतःचे अनुभव कथन केल्यावर शिबिरार्थींना प्रेरणा मिळणे आणि त्यांची भावजागृती होणे
प्रत्येक प्रशिक्षकाने स्वतःच्या जीवनात गुरुकृपेने अनेक पालट अनुभवले आहेत ; पण त्यांना ते प्रत्यक्ष व्यक्त करण्याची संधी मिळाली नव्हती. गुरुदेवांच्या कृपेने ‘लहान वयात साधना केल्यामुळे स्वतःमध्ये कसे पालट झाले ?’ ‘विविध सेवांच्या माध्यमातून गुरुदेवांनी समष्टी सेवा कशी शिकवली ?’, हे सर्व करतांना ‘घरगुती प्रसंगांमध्ये गुरु कशी काळजी घेतात ?’, ‘शिक्षण, पेशा किंवा व्यवसाय करण्याचे ध्येय घेण्यापेक्षा साधनेचे ध्येय जीवनामध्ये कसे निवडले ?’ ‘साधक आणि संत यांच्या माध्यमांतून जीवनाच्या उद्धाराचा मार्ग कसा मिळाला ?’, असे विविध अनुभव प्रशिक्षकांनी सांगितले. हे सांगत असतांना काहींचा भाव जागृत झाला. एकंदरित या अनुभव कथनाचा शिबिरार्थींवर सकारात्मक परिणाम झाला आणि शिबिरार्थींना कृतीशील शास्त्र शिकायला मिळाले. इतिहासात अनेकांनी त्याग केल्याचे आपण ऐकले आणि वाचले आहे; पण ‘आजच्या युगात आपल्याच वयाचे युवक आणि युवती राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कशा पद्धतीने योगदान देत आहेत ?’, यांविषयी शिबिरार्थींना शिकायला मिळाले आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली.
४. प्रशिक्षकांनी अनुभव कथन केल्यावर झालेले पालट
अ. शिबिरातील वातावरण स्तब्ध झाल्यासारखे वाटले.
आ. इतर विषयांच्या तुलनेत या विषयाच्या वेळी सर्वांची अंतर्मुखता अधिक जाणवली.
इ. ‘विषय संपूच नये’, असे बर्याच जणांना वाटत होते.
ई. सर्वांचा उत्साह आणि आनंद वाढला.
उ. शिबिरार्थींचाही भाव जागृत झाला.
ऊ. या सत्रामुळे शिबिराला आध्यात्मिक स्तरावर कलाटणी मिळाली.
ए. कृतज्ञताभावाची स्पंदने अनुभवायला मिळाली.’ (क्रमशः)
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२६.८.२०२३)
याच्या नंतरचा भाग पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/795063.html