श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !
कोल्हापूर – श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने येथील ब्राह्मण संस्था-संघटना यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यानंतर पेटाळा येथून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. झांज पथक, टाळकरी, महिला लेझीम पथक, ब्राह्मण समाजातील संत-महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्रीराम-सीता लक्ष्मण यांसह विविध व्यक्तींची सजीव भूमिका असणारे चित्ररथ होते. ही शोभायात्रा विविध मार्गांवर जाऊन न्यू हायस्कूल येथे परत आली. यात ब्राह्मण समाजातील समाजबांधव सहभागी झाले होते.
सायंकाळी ६.५५ वाजता श्रींचा पाळणा सोहळा झाल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आले. याचे पौरोहित्य श्री. प्रसाद निगुडकर यांनी केले. विशेष म्हणजे हा सोहळा ‘डॉल्बीमुक्त’ आणि प्रदूषणविरहित करण्यात आला. या सोहळ्यात ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ यांसह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.