परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ केले. त्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी आनंदप्राप्तीसाठी साधनेसंबंधी अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक लहान-मोठी प्रवचने घेणे, असे विविध मार्ग अवलंबले. आता सर्वत्रचे सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या लेखमालेत त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन देत आहोत.
त्याग करण्याचे महत्त्व !
आपले कौशल्य हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वकाही अर्पित करून श्रद्धापूर्वक कार्य करावे आणि ईश्वराच्या सान्निध्याची अनुभूती घ्यावी !
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, आज पुन्हा आपला सत्संग लाभला. येथून गेल्यानंतर मला प्रतिदिन असे वाटते, ‘मी आपल्याजवळ बसून बोलत आहे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : मलासुद्धा ‘आपण नेहमीच भेटत असतो’, असे वाटते.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : एका भेटीपासून दुसरी भेट होईपर्यंत वर्षभर असेच वाटते की, ‘लवकर जून मास यावा (प्रतिवर्ष जून मासात होणार्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनासाठी पू. हरि शंकर जैन येतात.) आणि येथे तुमच्याकडे निघून यावे.’ उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी तुमच्या कृपाशीर्वादाने सेवा चालू आहे. माझ्याकडून जे जे करणे शक्य आहे, ते सर्व मी करत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण आहात; म्हणून न्यायालयीन प्रक्रियेविषयी इतरांना ताण येत नाही. न्यायालयीन प्रक्रियेविषयी त्यांना काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तर ते आपण करता.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : हा आपला आशीर्वाद आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हीच तर साधना आहे. जे आपल्याला येते, त्याचा उपयोग करून साधक आणि ईश्वरप्राप्ती करणार्यांना साहाय्य करायचे. हाच साधनेच्या दृष्टीने त्याग आहे. हा वेळ आणि धन यांचा त्याग आहे. तुम्ही दुसरी कोणती याचिका घेतली असती, तर पुष्कळ पैसे कमावले असते; पण आपण ते सोडून समाज आणि हिंदू यांच्या हितासाठी वेळ दिलात अन् देत आहात.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : धर्मकार्य करण्यामुळे एक समाधान मिळते. पूर्वी मला वाटायचे की, ‘धर्मकार्य करण्यासाठी माझ्यासमवेत कुणी नाही आणि ते कार्य मी करत आहे.’ आता तुम्हाला भेटल्यापासून वाटते की, ‘आपण आणि (दैवी) शक्ती माझ्या समवेत आहात. ईश्वर माझ्यासमवेत आहे’. आपल्या आशीर्वादाने मला पुष्कळ लाभ झाला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘ईश्वर माझ्या समवेत आहे’, ही अनुभूती छान आहे ना !
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : मी मागील दोन वर्षांपासून आपण सांगितलेली साधना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून धर्मकार्य करतांना वाटते की, ‘तुमचा आशीर्वाद आमच्या समवेत सतत आहे, याची अनुभूती नेहमी येते.’ बाकी सर्व ईश्वराच्या हातात आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : राष्ट्र-धर्म यांच्याविषयी काही कार्य असले, तर समाजातील दुसरे लोक कसे म्हणतील, ‘‘अरे, तो मंत्री माझ्या ओळखीचा आहे. त्याला सांगू का ?’ त्यावर कुणी म्हणेल, ‘त्या मंत्र्याशी तुम्ही माझाही परिचय करून द्या. त्यांच्या कार्यालयात आमचे काम आहे.’ साधना आणि अध्यात्म करणारा असे कुणाला विचारत नाही. ‘अरे, ईश्वर आहे ना ! अन्य कुणाला कशाला विचारायचे ? तो सर्वकाही करील.’ अशी ही तुमची अनुभूती आहे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |