Abdul Qureshi Bail: ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन !

‘भारताचा ओसामा बिन लादेन’ म्हणून आहे ओळख !

अब्दुल सुभान कुरेशी

नवी देहली – वर्ष २०१० मध्ये सरकारने आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल सुभान कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. न्यायालयाने म्हटले की, केवळ याचिकाकर्त्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने भा.द.वि. च्या कलम ४३६-अ अंतर्गत दिलेला दिलासा नाकारण्याचे एकमेव कारण मानले जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपिठाने सांगितले की, प्रकरणातील सर्व तथ्ये अन् परिस्थिती लक्षात घेऊन अन् याचिकाकर्त्याने आधीच कारागृहात घालवलेला वेळ लक्षात घेऊन आम्ही जामिनाला अनुमती देत आहोत. कुरेशीला वर्ष २०१९ मध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर ठेवण्यात आलेले गुन्हे अधिकाधिक ५ वर्षांची शिक्षेची अनुमती देणारे होते. हा कालावधी पूर्ण होत आल्याने त्याला जामीन देण्यात आल्याचे या वेळी न्यायालयाने नमूद केले.

कोण आहे अब्दुल सुभान कुरेशी ?


‘सिमी’ या आधीच बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेकडून पुस्तके किंवा मजकूर प्रसिद्ध केला जात होता. कुरेशी हा त्या प्रकाशनांचा संपादक होता. देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो ‘इंडियन मुजाहिदीन’च्या सहसंस्थापकांपैकी एक होता. या आतंकवादी संघटनेचा उद्देश भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करणे, हा होता. वर्ष २०१० मध्ये जेव्हा इंडियन मुजाहिदीनवर बंदी घालण्यात आली, तेव्हा कुरेशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेत सहभागी झाला. या संघटनेलाही वर्ष २०४७ पर्यंत भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करायची आहे. शासनाने आता तिच्यावरही बंदी घातली आहे.