भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !

भेंडवळ घट मांडणीतील भाकीत

बुलढाणा : ‘यंदा बरा पाऊस असेल. पहिल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये अल्प पाऊस असेल. दुसर्‍या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सर्वसाधारण, तर तिसर्‍या महिन्यात ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. चौथ्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरा पाऊसमान असेल’, असे भाकीत ‘घट मांडणी’त वर्तवण्यात आले आहे.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावामध्ये ३५० वर्षांपासून पावसाचे भाकीत करण्याची परंपरा आहे. याला ‘घट मांडणी’ असे म्हणतात. या वेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे जमतात. या वर्षीचे भाकीत १० मे या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घोषित करण्यात आले. चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत त्यांचे वंशज पुंजाजी महाराज तथा त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी सूर्यास्ताच्या वेळी ही घटमांडणी केली.

(सौजन्य : TV9 Marathi)

कशी होते घटमांडणी ?

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावामध्ये ३५० वर्षांपासून चालत आलेली ‘घट मांडणी’

मातीच्या एका मोठ्या घटात अंबाडी, गहू, ज्वारी, तूर, उडिद, मूग, कपाशी, करडई, हरभरा, जवस, भादली, तांदूळ, वाटाणा, मसूर, बाजरी इत्यादी १८ प्रकारची धान्ये ठेवतात. घटाच्या मधोमध एक खड्डा खोदतात. त्यामध्ये ४ ढेकळे (घट्ट माती) ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. घागरीवर पुरी, सांडोळी, कुरडई, पापड, भजी, वडे आदी खाद्यपदार्थ ठेवतात. रात्रीच्या काळात या घटामध्ये जे काही पालट घडतात. त्यावरून यंदाच्या पीक पाण्याविषयीचा अंदाज कळतो.

या वेळी नेहमी राजकीय घडामोडींविषयीही भाकीत होते; परंतु या वेळी लोकसभेच्या निवडणुका चालू असल्याने त्याविषयीचे भाष्य घोषित करण्यात आले नाही; येथे ठेवलेला पान आणि विडा सुपारी हे कायम असल्याने राजाला कोणताही धोका नसल्याची इथे चर्चा येथे होती. गावालगत असलेल्या शेतामध्ये ही मांडणी करण्यात आली.

या भाकितात पुढे म्हटले आहे, ‘यंदा तुरीचे अनिश्‍चित उत्पादन, ज्वारी सर्वसाधारण, मुग-उडीद सर्वसाधारण, बाजारी सर्वसाधारण, तर तीळ पीक चांगले असेल, तसेच पिकांवर रोगराई असेल. साळीचे अर्थात् भाताचे पीक चांगले असेल.’