केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत
नवी देहली – मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने देहलीचे आम आदमी पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत केला आहे. तसेच २ जून या दिवशी केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) आत्मसमर्पण करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. या याचिकेवर ७ मे या दिवशी सुनावणी पार पडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता.
केजरीवाल २१ मार्च या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी देहली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती.