उत्तरप्रदेशात निवडणुकीत नोटांऐवजी अमली पदार्थांचा विक्रमी पुरवठा !
२३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – निवडणूक आयोगाच्या कठोरतेमुळे या वेळी अमली पदार्थाने निवडणुकीत वापरल्या जाणार्या काळ्या पैशाचे रूप धारण केले आहे, असे म्हणता येईल. राज्यात आतापर्यंत २३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून केवळ ३४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
१३ एप्रिलपर्यंत ४ सहस्र ६५० कोटी रुपयांची रोकड, दारू, अमली पदार्थ जप्त !
१६ मार्च या दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक आयोगाच्या ‘मनी पॉवर वॉच टीम’ने १३ एप्रिलपर्यंत ४ सहस्र ६५० कोटी रुपयांची रोकड, दारू, अमली पदार्थ इत्यादी जप्त केले. देशाच्या ७५ वर्षांच्या संसदीय निवडणुकीच्या इतिहासातील ते सर्वाधिक आहे. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात ३ सहस्र ४७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, यावरून याचा अंदाज लावता येतो.