विशेष संपादकीय : अग्नीदिव्य संपले, तरीही…!
गेली १० वर्षे चाललेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल अंतिमतः घोषित होऊन ३ हिंदुत्वनिष्ठांचे निर्दाेषत्व सिद्ध झाले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या २ हिंदुत्वनिष्ठांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली असली, तरी उच्च न्यायालयात त्यांनाही न्याय मिळेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ‘सत्याकडे अंतिम विजयश्री खेचली जातेच’, हे त्या वेळी सिद्ध होईल, यात आम्हाला यत्किंचितही शंका नाही. या हत्या प्रकरणात सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना नाहक गुंतवण्यात आल्यानंतर एका प्रदीर्घ कालावधीच्या अग्नीदिव्यातून सनातन संस्था आणि संस्थेचे साधक गेले; परंतु अर्थात्च सनातन संस्थेप्रमाणेच संस्थेचे साधक अन् हिंदुत्वनिष्ठ सीतामाईप्रमाणे निष्कलंक असल्यामुळे या अग्नीदिव्यातून ते बाहेर पडले, तसेच हे २ हिंदुत्वनिष्ठही बाहेर पडतील आणि त्यांच्या पाठीमागे सनातन संस्था भक्कमपणे उभी राहील; कारण हा लढा केवळ सनातन संस्थेपुरता मर्यादित नाही, तर हिंदुत्वाची अपकीर्ती करून, हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्याच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच एक भाग आहे. पुरोगाम्यांच्या हत्यांनंतर निर्माण झालेला संघर्ष हा थेट ‘शहरी नक्षलवादी आणि साम्यवादी विरुद्ध हिंदुत्वनिष्ठ’, असाच पुढे आला आहे. पर्यायाने देशद्रोही विरुद्ध राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यातील हा लढा आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या माध्यमातून सनातन संस्थेला ‘भगवे आतंकवादी’ ठरवून वारंवार ‘जवाब’ मागितला गेला…, प्रसारमाध्यमांकडून अनेक वर्षे ‘मिडिया ट्रायल’ (माध्यमांनी न्यायाधिशांच्या भूमिकेत राहून केलेले वार्तांकन) चालवून तिला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यात आले. ईश्वरनिष्ठ आणि निर्दाेष संस्थेच्या साधकांचा नाहक शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ करून त्यांची अपकीर्ती करण्यात आली, त्या सर्व संघर्षाचा अंत काही प्रमाणात तरी आजच्या सी.बी.आय. न्यायालयाच्या निकालानंतर झाला आहे. प्रसारमाध्यमांना पूर्वीच कल्पना देऊन पोलिसांनी आश्रमावर धाडी घातल्या. ‘कुठल्याही क्षणी पोलीस आश्रमात येऊ शकतात’, अशी स्थिती कित्येक वर्षे होती. दाभोलकर हत्या प्रकरणानंतर कितीतरी वेळा असे असायचे की, प्रसारमाध्यमांतील मंडळी सनातनच्या आश्रमात अचानक गोळा व्हायची आणि काही कळायच्या आतच वृत्तवाहिन्यांवर ‘ब्रेकिंग न्यूज’ चालू व्हायच्या. हा सारा संघर्ष सनातन संस्थेच्या साधकांना घडवणारा, पुष्कळ काही शिकवणारा आणि अर्थात्च त्यांची साधना करवून घेणारा होता; त्यामुळेच सनातनवर कितीही संकटे आली, तरी साधकांना पुष्कळ भीती वाटली किंवा पुष्कळ काळजी वाटली, असे कधी झाले नाही. साधकांची ईश्वरनिष्ठा आणि गुरूंवरील श्रद्धा यांनी त्यांना यातून तारून नेले. नोकरी, व्यवसाय सांभाळून सनातनच्या धर्मप्रचाराचे कार्य करणार्या साधकांना समाजातील लोकांच्या प्रश्नांना आणि प्रश्नार्थक दृष्टीला तोंड द्यावे लागले; परंतु ईश्वरावरील श्रद्धेमुळेच ते हा सारा संघर्ष पचवू शकले. या काळात केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते अन् हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या प्रभावाने त्यांनी सनातनवर बंदी आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; परंतु वस्तूस्थितीत मात्र विरोधी पक्षातील कितीतरी आमदारांना ‘सनातनचे कार्य चांगलेच आहे’, हे ठाऊक होते. सोन्यावर जसा कशाचा परिणाम होत नाही किंवा सत्याचे अस्तित्व नेहमी चिरकाल टिकते, तसे सनातन संस्था ही स्वयं ईश्वराच्या आशीर्वादाने चालत असल्यामुळे तिच्यावर कितीही आरोप-प्रत्यारोप झाले, बंदीच्या वल्गना झाल्या, तिच्या साधकांना कारागृहात टाकले गेले, तरी ती आता या अग्नीदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडत उलट अधिक उजळून निघत स्थापनेचा ‘रौप्य महोत्सव’ साजरा करत आहे.
भरकटलेल्या तपासातील फोलपणा !
दाभोलकर हत्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणांनी केलेल्या असंख्य खोट्यानाट्या गोष्टी एक एक करून संपूर्ण समाजापर्यंत पोचल्या, तर समाजाचा या तथाकथित नावाजलेल्या अन्वेषण यंत्रणांवरील विश्वास पूर्णपणे उडेल यात शंका नाही; किंबहुना भारतातील अन्य खटल्यांत काय होत असेल, याचीही यावरून कल्पना येते. एखाद्या मोठ्या मालिकेत जशी अनेक उपकथानके असतात, तशी अनेक उपकथानके पोलिसांच्या या अन्वेषण भरकटवण्याच्या नादात निर्माण झाली. पोलिसांनी एखाद्याच्या दबावाखाली येऊन किती खोटे वागावे आणि जनतेला वेडे बनवावे, याचे या खटल्याएवढे दुसरे मोठे उदाहरण नसेल. एक खोटे पचवण्यासाठी दुसरे खोटे सूत्र निर्माण करणे, ते लपवण्यासाठी तिसरे, असे करून अन्वेषण यंत्रणा निष्पाप आरोपींच्या आयुष्याशी तर खेळल्याच; पण कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशीही खेळल्या; कारण हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी हा सारा खटाटोप चालू होता. दाभोलकर प्रकरणामध्ये कळव्याच्या खाडीत टाकलेले पिस्तूल ५ वर्र्षांनंतर शोधणे, ते स्कॉटलंडला पाठवणार असल्याचे सांगणे, ६ मासांनंतर ते पाठवलेच नसल्याचे सांगणे, वारंवार धादांत खोट्या साक्षी पुढे आणणे; दाभोलकर अन् पानसरे कुटुंबियांच्या सांगण्यावरून ५ वर्षे खटला चालू न देणे, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने स्वतःच केलेले कित्येक दावे नंतर खोडून काढणे, स्वतः पकडलेल्या आरोपींना सोडून देणे, यंत्रणा आणि साक्षीदार यांनी वेगवेगळे मारेकरी आरोपी सांगणे; मारेकरी अन् शस्त्रे पालटत रहाणे; दाभोलकरांवर झालेल्या विविध आरोपांपैकी कुठल्याच दिशेने अन्वेषण पुढे न नेणे, सीबीआयने प्रत्यक्षात कुठलेच पुरावे समोर न आणणे, अशी पुष्कळ मोठा ग्रंथ होईल एवढी अन्वेषणातील फोलपणा दर्शवणारी असंख्य सूत्रे पुढे आली. समाजातील विविध क्षेत्रांतील तज्ञांच्याही ती लक्षात आली आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ती मांडली. अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांवरच नव्हे, तर हिंदूंवर घोर अन्याय करून एक प्रकारे मोठे पापकर्मच केले आहे.
खरे आरोपी कोण ?
अंनिसच्या न्यासाचे घोटाळे बाहेर काढले होते, त्या न्यासावरील पदाधिकार्यांपैकी एक पवार कुटुंबियांपैकी प्रताप पवार हे होते. त्यांच्या नातलग खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्ष २०१६ मध्ये सनातन संस्थेवर बंदी आणण्याविषयी राज्यसभेच्या भाषणात सांगितले. या सार्या गोष्टी थेट सनातन संस्थेशी निगडित होत्या. वर्ष २०१५ मध्ये सनातन संस्थेचे तत्कालीन प्रवक्ते ‘अभय वर्तक यांना गोळ्या घाला’, असे पत्रक भारत पाटणकर यांनी काढले होते. हा थेट आतंकवाद नव्हता का ? अंनिसचा एक कार्यकर्ता नक्षलवादी निघाल्याविषयी दाभोलकरांनी स्पष्टीकरण दिले होते. हे प्रकरण चालू असतांना महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलेल्या वचनावर आधारित सनातनच्या ‘क्षात्रधर्म’ या ग्रंथांवर हास्यास्पद आक्षेप घेतले गेले. किती घोर विरोधाभास होता हा ! अंनिसचे तब्बल ९ आर्थिक घोटाळे बाहेर काढले गेले, शेवटी दाभोलकरांच्या खिशात रशियाचे सीमकार्ड मिळाले, याकडे अन्वेषण यंत्रणा कधी वळणार ?
सनातनचे धर्मयोद्धे साधक !
धर्मयुद्धातील अंतिम विजयापूर्वी प्रत्येक धर्मयोद्ध्याला संघर्षातून जावेच लागते. हा विजय म्हणजे त्यातीलच एक टप्पा आहे. सनातनच्या या अवघड काळात ईश्वरनिष्ठ आणि नम्र साधकांनी कुठेही त्यांचा संयम सोडला नाही कि कुठे त्यांची निष्ठाही ढळली नाही. आतापर्यंत सनातनची शेकडो आंदोलने, प्रसारफेर्या आदी झाल्या आहेत. यात ना कुठे आक्रस्ताळेपणा झाला ना कुठे झटापट; उलट कायमच सनातन संस्थेने पोलीस प्रशासनाचा मोठा विश्वास संपादन केला आहे. पोलिसांनी सनातनच्या शेकडो साधकांच्या चौकशाही केल्या; पण एकातरी पोलिसाने सांगावे की, सनातनच्या साधकाने बोलतांना कधी त्याची मर्यादा ओलांडली का ? शेकडो पोलिसांनी सनातनचे साधक जवळून पाहिले; त्यांना ते गुंड वाटले कि आतंकवादी ? ‘तरीही सनातन आतंकवादी संघटना असल्याने तिच्यावर बंदी घाला’, ही मागणी आणि राजकीय नेते, पुरोगामी आणि माध्यमे यांनी चालवलेली खोटी कथानके किंवा ‘मिडिया ट्रायल’ यांविषयी ते काही न बोलता, ते त्या दबावाखाली आले. म्हणूनच सनातनच्या साधकांचा काही वैयक्तिक लढा नव्हता, तर व्यापक अर्थाने धर्मासाठी दिलेला वैचारिक लढा होता. भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचे राष्ट्राचे शत्रू आणि राजकारणी यांचे विद्वेषी धोरण राबवण्यासाठी सनातन संस्थेलाही लक्ष्य केले गेले; परंतु व्यापक धर्मकार्य आणि नक्षल्यांच्या विरोधातील व्यापक राष्ट्रकार्य, यांमुळे साधक या मोठ्या कालावधीतील संघर्षाला ईश्वरावर श्रद्धा ठेवून सामोरे गेले अन् ईश्वराने त्यांना श्रद्धा आणि सबुरी यांचे फळ दिले.
भगवा आतंकवादाचे कथानक रंगवण्यासाठी सनातनचा छळ करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |