हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

पुरोगामी पत्रकार आता क्षमा मागणार का ?

दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या सनातनच्या संघर्षमय काळाला उजाळा देणारे अनुभव !

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी सनातन संस्थेच्या मनात आदरच आहे. अनेक घोटाळे उघड करणारे आणि राजकारण्यांवर चाप बसवणारे पत्रकार जवळून पाहिले आहेत. या सर्वांविषयी आमच्या मनात आदराचीच भावना आहे; परंतु दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातनद्वेषी पत्रकारिता करून काही साम्यवादी विचारसरणीच्या पत्रकारांच्या टोळीने वैचारिक प्रदूषण करून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. याविषयी माहिती देणे, हा या लेखाचा उद्देश आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर राजकारण्यांनी सनातनला थेट आरोपी घोषित केले. त्यानंतर सनातनच्या साधकांच्या चौकशा, आश्रमावरील धाडी, साधकांचे अटकसत्र आदी चालू असतांना या हिंदुद्वेषी पत्रकारितेचा आणि राजकारण्यांचा भयानक अनुभव सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना आला.

श्री. अभय वर्तक

आज सनातनचे साधक यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. आज प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु राष्ट्र किंवा हिंदूंच्या व्यथाही काही प्रमाणात मांडल्या जात आहेत. हे हिंदूहिताच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांमध्ये झालेला हा सकारात्मक पालट सुखावणारा आहे. १० वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती तशी नव्हती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर श्री. वर्तक हे हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी यांच्या वैचारिक आतंकवादाला कसे सामोरे गेले आणि या सर्वांचा वैचारिक प्रतिवाद कसा केला, याचे काही अनुभव त्यांनी येथे थोडक्यात मांडले आहेत.

(पूर्वार्ध)

१. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ !

डॉ. दाभोलकरांची हत्या काही राजकीय नेत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी झाली होती. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस आणि संलग्न पक्षांमध्ये यावरून खोटी कथानके पेरण्याची मोठी चढाओढ चालू झाली. काँग्रेस ‘सर्व हिंदू कसे आतंकवादी आहेत ?’, हे सिद्ध करण्याच्या मागे लागली होती. यातून त्यांना मुसलमानांना प्रसन्न करायचे होते. ‘केवळ इसिसचेच आतंकवादी असतात असे नाही, तर हिंदूही आतंकवादीही असतात’, असे देशाचे तत्कालीन गृहमंत्री, राज्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री आदी नेते उघड उघड व्यासपिठांवरून बोलू लागले होते. दाभोलकरांची हत्या झाल्याचा आनंद कदाचित् तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना झाला असावा. त्यामुळे त्यांनी अगदी उतावळेपणाने दीड घंट्याच्या आतच ‘एन्.डी.टीव्ही’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि ‘दाभोलकरांची हत्या गोडसेवादी शक्तीने केली आहे’, असे घोषित करून टाकले ! ‘आता या हत्येला आपण कोणत्या तरी हिंदुत्वनिष्ठ संघटनेला उत्तरदायी ठरवून पुन्हा एकदा ‘हिंदु आतंकवादा’चे खोटे कथानक सिद्ध करू शकू’, असे त्यांना वाटले.

२. दाभोलकरांच्या हत्येचे दिवस मोजणार्‍या पीतपत्रकारांकडून शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची नोंदही नाही !

दाभोलकरांच्या हत्येनंतर काही संपादकांनी त्यांच्या वृत्तवाहिनीवर दाभोलकर हत्येचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे जवळजवळ ५० ते ६० दिवस मालिका चालू ठेवली होती. वृत्तवाहिनीच्या ‘स्क्रीन’वर कोपर्‍यामध्ये बोधचिन्हाच्या येथे ‘दाभोलकर हत्येचा आजचा कितवा दिवस ?’ अशा प्रकारची वाक्ये माध्यमांमध्ये यायची; जणू काही गांधी हत्येनंतर भारतामध्ये एवढी मोठी हत्या दुसरी कुठली झालेलीच नाही ! तोपर्यंत भारतामध्ये ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या हत्या झाल्या होत्या; पण आतापर्यंत असे दिवस कधी मोजले गेले नव्हते, ना त्यांची संख्या मोजली गेली होती ! काश्मीरमध्ये ५ लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले होते. त्याची कधी यांनी नोंदही घेतली नाही. नक्षलवाद्यांनी निरपराध १४ सहस्र नागरिकांची हत्या केली होती. त्याविषयी कधी कुणी ‘ब्र’ काढला नाही; परंतु दाभोलकरांच्या हत्येनंतर पीतपत्रकारिता करून ‘पक्षपाती पत्रकारिता’ कशी असते ?’, याचे जणू एक ज्वलंत उदाहरणच या साम्यवादी पत्रकार टोळीने पत्रकारितेच्या इतिहासात दाखवून दिले.

३. वैचारिक आतंकवादी निखिल वागळे यांचा थयथयाट !

३ अ. सनातनवर बेछूट आरोप करण्यास आरंभ : निखिल वागळे यांनी दाभोलकरांची हत्या होताच सनातन संस्थेच्या विरोधात भयंकर वक्तव्ये करण्यास आरंभ केला. ‘सनातनच्या लोकांची चौकशी करा’, ‘सनातन्यांनी दाभोलकरांचा छळ कसा केला ?’ इत्यादी वक्तव्य बेछूटरित्या करण्यास त्यांनी आरंभ केला. सर्वच प्रसारमाध्यमांनी खोट्या आरोपांची झोड उठवली  होती. त्या काळात सनातनच्या साधकांनी किती प्रकारचा त्रास सहन केला, हे सांगायला गेले, तर मोठी मालिका होईल.

निखिल वागळे, सनातनची जाहीर क्षमा मागा !

निखिल वागळे

आज सनातन संस्थेच्या साधकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मागील ११ वर्षे निखिल वागळे यांनी सनातनविषयी खोट्या बातम्या प्रसारित करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. सनातनच्या प्रवक्त्यांना बोलून त्यांची मुस्कटदाबी करणे, त्यांना अवमानित करणे यांसारखे अश्लाघ्य प्रकार त्यांनी केले आहेत. आता न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सूर्यप्रकाशाइतके सत्य समोर आले आहे. त्यामुळे निखिल वागळे यांच्यामध्ये धाडस असल्यास त्यांनी ‘स्क्रीन’वर येऊन सनातनची सार्वजनिक क्षमायाचना मागितली पाहिजे. त्यांच्या पीतपत्रकारितेचा आढावा घेतल्यास ते असे कधीही करणार नाहीत ! कारण तत्त्वहीनता आणि खोटारडेपणा हा त्यांच्या अंगात भिनला आहे !

निखिल वागळे : सनातनची क्षमा मागणार का ? जवाब दो !

३ आ. सनातनच्या प्रवक्त्याने भ्रमणभाष केल्यावर आक्रस्तळेपणे बोलणारे निखिल वागळे ! : हत्येच्या दिवशी म्हणजे २० ऑगस्ट २०१३ या दिवशी मी स्वतः निखिल वागळे यांना भ्रमणभाषवरून संपर्क केला आणि ‘अशा प्रकारे सनातनची चालू केलेली अपकीर्ती थांबवावी’, अशी विनंती केली. निखिल वागळे यांनी मला भ्रमणभाषवरून जोरजोरात ओरडायला आरंभ केला, ‘तुम्ही मला दूरभाष करण्याचे धाडस कसे केले ? तुम्हीच हत्या केली आहे’, असे तावातावाने ते सांगत होते. एकही वाक्य ऐकून घेण्याची त्यांची मन:स्थिती नव्हती. ‘एका वाहिनीचा संपादक असे कसे बोलू शकतो ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. एरव्ही राज्यघटनेची भाषा आणि विवेकवाद्यांचा विवेक कुठे गेला ? असा हा प्रश्न होता. सनातन संस्थेच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे निखिल वागळे हे सनातन संस्थेवर तुटून पडले होते.

४. सनातनची पत्रकार परिषद उधळून लावण्याचा निखिल वागळे यांचा डाव अयशस्वी !

सनातनने दाभोलकर प्रकरणाविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेथे  निखिल वागळे यांनी त्यांच्या ५ पत्रकारांना पाठवले होते. ही पत्रकार परिषद उधळून लावायचा त्यांचा डाव होता. प्रत्येक जण एकेका कोपर्‍यात बसला होता. पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वीच प्रत्येक जण विविध प्रश्नांची सरबत्ती करू लागला. त्यातील प्रत्येक पत्रकाराला मी नावाने ओळखत होतो. त्यामुळे मी त्यांना ‘पत्रकार परिषद सुपारी घेऊन उधळू नये’, असे स्पष्टपणे सुनावले. त्यानंतर त्यांचा आवाज गप्प झाला. त्या वेळी ईश्वरी कृपेमुळे अन्य काही चांगल्या पत्रकारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘हे वागळे यांचे पिंटू आहेत, यांना थांबवा’, ‘तुम्हाला पत्रकार परिषद ऐकायची नसेल, तर तुम्ही बाहेर जा’, असे अन्य पत्रकारांनीच त्यांना सुनावले. त्यामुळे त्यांच्यातील काही जणांना बाहेर जावे लागले आणि आमची पत्रकार परिषद सुरळीत झाली.

५. पत्रकारितेतील निखिल वागळे यांची हुकूमशाही संपुष्टात !

वर्ष २०१४ मध्ये देशात हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आले. त्यानंतर पुरोगामी पत्रकारांच्या नोकर्‍या हळूहळू धोक्यात येऊ लागल्या. निखिल वागळे यांची ‘आय.बी.एन् लोकमत’ मधील १४ वर्षांची मक्तेदारी आणि वैचारिक गुंडगिरी वर्ष २०१४ मध्ये संपुष्टात आली. ही केवळ ईश्वरी योजना होती. तो काळ हिंदुत्वासाठी खरच पुष्कळ कठीण काळ होता ! ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही उच्चारणे एक महापाप असल्याप्रमाणे होते. त्या काळी पक्षपाती पुरोगामी पत्रकारिता (सिलेक्टिव्ह जर्नालिझम्) ही मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. असे असतांना या पुरोगामी पत्रकारांच्या टोळीला निखिल वागळे यांची हकालपट्टी एक मोठा धक्का होता. पुढे ‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीमधूनही त्यांना घरी जावे लागले. त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर पुष्कळ धडपड केली. महेश मोतेवार या एका भ्रष्ट चिटफंड घोटाळा करणार्‍या व्यक्तीने चालू केलेल्या ‘मी मराठी’ नावाच्या वृत्तवाहिनीवर निखिल वागळे यांनी शेवटची पत्रकारितेची नोकरी केली. ही नोकरी म्हणजे आयुष्यभर तत्त्वनिष्ठेचा एक प्रकारचा कांगावा करणार्‍या वागळेंचा स्वतःच स्वतःने केलेला ‘पर्दाफाश’ होता.

(क्रमशः)

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.

(उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/792853.html)