वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व पहातांना देवद (पनवेल) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ (वय ३७ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘फेब्रुवारी २०२३ मध्ये देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वाहनांशी संबंधित सेवा पहाणार्‍या साधकाला वैयक्तिक कारणासाठी काही दिवस घरी जावे लागले. त्यामुळे त्या कालावधीत अन्य साधकाकडे त्या सेवेचे दायित्व होते. त्या वेळी ‘त्या साधकाला नियोजन करण्यात काही साहाय्य लागल्यास तू कर’, असे मला उत्तरदायी साधिकेने सांगितले. त्यानंतर अन्य काही सेवांमुळे त्या साधकालाही १ मास सेवेसाठी बाहेरगावी जावे लागले. त्यामुळे मी साधिकेला सांगितले, ‘‘सध्या कुणीच साधक उपलब्ध होत नाही, तर मी समन्वय पहातो आणि ‘साधकांना आणणे आणि बाहेर पोचवणे, ही सेवा संबंधित साधकाच्या सहसाधकांनी करावी’, असे नियोजन करतो.’’

श्री. निनाद गाडगीळ

१. वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व पहातांना आरंभी झालेली मनाची विचारप्रक्रिया

१ अ. ‘सेवा काही दिवसच करायची आहे’, या विचाराने सेवा मनापासून केली न जाणे : प्रारंभी सेवा करतांना एखाद्या साधकाला आश्रमातून बाहेर जायचे असल्यास त्याच्या सहसाधकांपैकी एखाद्या साधकाला त्याला पोचवायला सांगणे, एवढेच मी पहात होतो. काही वेळा या सेवेसाठी साधक उपलब्ध न झाल्यास मला जोडून दिलेल्या साधकाला मी सेवा करायला सांगत होतो. काही वेळा चालक साधक उपलब्ध न झाल्यास मी संबंधित साधकांना सांगत होतो, ‘‘चालक साधक उपलब्ध नाही. तुम्ही समजून घ्या.’’ तेव्हा माझा ‘ही सेवा मला काही दिवसच करायची आहे’, असा विचार होऊन ती सेवा माझ्याकडून मनापासून केली जात नव्हती.

२. सेवा करतांना भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न

२ अ. आरंभी ‘वाहनसेवेचे कसे नियोजन करायचे ?’, त्याविषयी लक्षात न येणे आणि त्या वेळी ‘योगेश्वर श्रीकृष्ण सारथी आहे अन् त्याच्याकडेच सेवेचे दायित्व आहे’, हे लक्षात येऊन स्वतःतील अहंची जाणीव होणे : आरंभी वाहनसेवेचे नियोजन करतांना ‘कोणत्या साधकाला चालक म्हणून सेवा करण्यासाठी विचारायचे ? प्रत्येकाच्या नियोजनानुसार चालक साधक उपलब्ध करून द्यायचा कि वेळेचे नियोजन पालटायचे ?’, हे माझ्या लक्षात यायचे नाही. एकदा मी या सेवेचे नियोजन करतांना मला एका गीतामधील ‘योगेश्वर हा कृष्ण असे सदैव हो सारथी ।’ ही ओळ आठवली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘साक्षात् भगवान श्रीकृष्णाकडे वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व आहे. त्यामुळे मी नियोजन करणारा कोण ? तोच सर्व नियोजन करणार आहे आणि तोच चालकही उपलब्ध करून देणार आहे.’ या प्रसंगामुळे देवानेच मला माझ्यातील ‘मी नियोजन करतो आणि चालक साधक उपलब्ध करून देतो’, या अहंची जाणीव करून दिली.

२ आ. ‘देवच वाहनाशी संबंधित सेवा पहात असून तोच चालक साधकही उपलब्ध करून देत आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यामुळे चालक साधक मिळण्यासाठी अडचण न येणे आणि नियोजनाच्या सेवेसाठी लागणारा कालावधी न्यून होणे : त्यानंतर मी सेवेचे नियोजन करायला बसल्यावर आपोआपच माझी देवाला ‘तू ज्या चालक साधकाचे नियोजन केले आहेस, त्याचे नाव नियोजनात येऊ दे’, अशी प्रार्थना होत असे. ‘देवच वाहनाशी संबंधित सेवा बघत असून तोच चालक साधकही उपलब्ध करून देत आहे’, असा भाव ठेवून मी प्रयत्न केल्यामुळे नंतर चालक साधक मिळण्यासाठी कधीच अडचण आली नाही. आरंभी मला सेवेचे नियोजन करण्यासाठी पाऊण घंटा लागायचा. नंतर तेच नियोजन १५ ते २० मिनिटांतच होऊ लागले. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२ इ. ‘गुरूंच्या सेवेसाठी साधक येणार आहे आणि त्याच्या सेवेची संधी देवाने दिली आहे’, असा भाव ठेवणे

२ इ १. ‘एक साधकाला पहाटे बसस्थानकातून आश्रमात आणायचे आहे’, असे समजल्यावर त्याला समजून घेण्याचे विचार मनात येणे : ‘एका साधक बसस्थानकावर पहाटे ३.३० वाजता येणार आहे आणि त्याला आश्रमात आणण्यासाठी साधकाचे नियोजन करायचे आहे’, असे मला समजले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘वाहनाशी संबंधित सेवा करणारा कुणी साधक नाही आणि त्या साधकाचा सहसाधकही नाही, तर इतक्या पहाटे साधकांना बसस्थानकावर जाण्यासाठी अडचण येईल’, हे संबंधित साधकाने समजून घेतले असते, तर बरे झाले असते.’ दुसर्‍याच क्षणी माझ्या लक्षात आले, ‘त्या साधकाचीही काहीतरी अडचण असेल.’ ‘गुरूंच्या सेवेसाठी तो साधक येणार आहे. देवाने मला त्याच्या सेवेची संधी दिली आहे’, असा विचार करून मी नियोजन करायला घेतले.

२ इ २. ‘पहाटे बसस्थानकावर येणार्‍या साधकाला आश्रमात आणण्यासाठी देवानेच बाहेर राहून नोकरी करणारा साधक त्या दिवशी आश्रमात पाठवला आहे’, असे वाटणे : ‘इतक्या पहाटे एखाद्या साधकाला झोपेतून उठून कसे जायला सांगायचे ?’, असे मला वाटत होते. तेव्हा ‘त्या संबंधित साधकालाच त्याच्या सहसाधकाचे नियोजन करायला सांगूया’, असे मला वाटले; मात्र ‘त्याच्या सहसाधकाची झोपमोड होईल’, असा विचार करून त्या साधकांना सांगितले नाही. त्या वेळी बाहेर राहून नोकरी करणारा साधक सेवेसाठी आश्रमात आला होता आणि त्याला दुसर्‍या दिवशी सुटी असल्याने तो आश्रमात थांबणार होता. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘देवानेच त्या साधकाला या सेवेसाठी पाठवले आहे.’

२ ई. वाहनाशी संबंधित आणि एक सेवा या सेवांचे दायित्व असतांना ‘नियोजन कसे करायचे ?’, ते तूच बघ’, अशी देवाला प्रार्थना करणे आणि त्या ४ दिवसांच्या कालावधीत वाहनसेवेत नियोजनाचे प्रमाण न्यून असणे अन् दोन्ही सेवांचे नियोजन व्यवस्थित करता येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणे : त्या कालावधीत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा (सनातनचे १६ वे संत) यांनी देहत्याग केला. त्या वेळी त्यांचा दहावा आणि तेरावा या दिवशी करण्यात येणार्‍या विधींशी संबंधित सेवेचे दायित्व माझ्याकडे होते. त्यामुळे मला ४ दिवस वाहनाशी संबंधित सेवेसाठी वेळ देता येणे शक्य नव्हते. ‘मला विधींशी संबंधित सेवेचे नियोजन पहायचे असेल, तर वाहनाशी संबंधित सेवा करण्याच्या सेवेत साहाय्य लागेल’, असे मी उत्तरदायी साधकांना सांगितले; पण त्यांच्याकडेही साधक उपलब्ध नसल्याने त्यांनी अन्य सेवा करणार्‍या साधकांना संपर्क करून नियोजन करण्यास सांगितले. त्या वेळी मी सकारात्मक राहून देवाला प्रार्थना केली, ‘तूच मला वाहनाशी संबंधित आणि विधींशी संबंधित सेवा दिल्या आहेस. त्या सेवांचे नियोजन कसे करायचे ?’, ते तूच बघ.’ त्या ४ दिवसांच्या कालावधीत वाहनाशी संबंधित सेवेत नियोजन करण्याचे प्रमाण न्यून होते. त्यामुळे मला दोन्ही सेवा व्यवस्थित करता आल्या. परात्पर गुरु डॉक्टरांचीच ही कृपा आहे.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. एका प्रसंगातून ‘बाहेर जाणार्‍या साधकांना नुसते चालक साधक उपलब्ध करून देणे’, ही साधना नाही, तर ‘प्रत्येक साधकाला वेळेत संबंधित स्थळी पोचवणे आणि आणणे’, ही साधना आहे’, हे लक्षात येणे : एका प्रसंगात साधकांना बाहेरून आश्रमात येण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा बराच उशीर झाला. त्या प्रसंगात उत्तरदायी साधिकेने वाहनाशी संबंधित सेवेच्या संदर्भातील चूक माझ्या लक्षात आणून दिली आणि ‘साधकांना आणण्यास उशीर झाला, तर त्या साधकाच्या साधनेचा तेवढा वेळ वाया जातो’, असे सांगितले. त्या सत्संगानंतर मला स्वत:कडून झालेल्या चुकीची जाणीव झाली. ‘बाहेर जाणार्‍या साधकांना नुसते चालक साधक उपलब्ध करून देणे, ही साधना नाही, तर ‘प्रत्येक साधकाला वेळेत पोचवणे आणि आणणे’, ही माझी साधना आहे’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. दायित्वाची जाणीव वाढणे आणि या सेवेतून स्वतःत ‘इतरांचा विचार करणे, इतरांना समजून घेणे, प्रेमभाव, परिस्थिती स्वीकारणे’ आदी गुणांची वाढ होण्यास साहाय्य होणे : या प्रसंगानंतर मी ‘वाहनाशी संबंधित सेवेचे नियोजन नियमित पहाणे, चालक साधक वेळेत उपलब्ध होत आहेत कि नाहीत ? साधकांना आणायला कुणाला अडचण नाही ना ?’, हे सर्व पाहू लागलो. एखाद्या ठिकाणच्या चालक साधकाला अडचण आल्यास अन्य ठिकाणचे चालक साधक उपलब्ध आहेत कि नाहीत, ते पाहून त्यांचे साहाय्य मी घेऊ लागलो. या प्रसंगातून माझ्यातील दायित्वाची जाणीव वाढली. या सेवेमुळे माझ्यातील ‘इतरांचा विचार करणे, इतरांना समजून घेणे, प्रेमभाव, परिस्थिती स्वीकारणे’ आदी गुण वाढण्यास साहाय्य झाले.

३ इ. ‘साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच रूप असून स्वतःचा वेळ गेला, तरी साधकांना अडचण येणार नाही, अशा ठिकाणी त्यांना पोचवायला हवे’, असे वाटणे आणि ‘देवाला साधकांची अशीच काळजी घेणे अपेक्षित आहे’, हे लक्षात येणे : एकदा ‘एका वयस्कर काकूंना रेल्वेस्थानकावर पोचवायचे आहे’, असा मला निरोप मिळाला. त्या काकूंना लगेच निघायचे असल्याने मी त्यांना पोचवण्यासाठी निघालो. त्या वेळी माझ्याकडील चालू असलेली सेवा बाजूला ठेवून मी जात होतो. त्यामुळे माझ्या मनात ‘त्यांना लगेच सोडून परत येऊ या. त्यांना नवीन पनवेल येथील जिन्याच्या बाजूला सोडू, म्हणजे माझा वेळ वाचेल’, असा विचार आला. त्या वेळी मला वाटले, ‘साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच रूप आहेत. माझा वेळ जरी गेला, तरी काकूंना अडचण येणार नाही’, अशा ठिकाणी पोचवू.’ मी त्या काकूंना सांगितले, ‘‘मी तुम्हाला स्थानकाजवळ सोडतो; म्हणजे तुम्हाला जिना चढावा लागणार नाही आणि सोयीचे होईल.’’ त्या वेळी त्या काकू म्हणाल्या, ‘‘मलाही वाटत होते, ‘‘तुम्ही मला त्याच बाजूला सोडावे; पण तुम्हाला सेवेतून यावे लागले ना ? मग मी माझी सोय कशी पाहू ?’’ या प्रसंगानंतर माझ्या लक्षात आले, ‘देवाला साधकांची अशीच काळजी घेणे अपेक्षित आहे.’

३ ई. ‘केवळ सेवेचे नियोजन न करता चालक म्हणून सेवेत सहभागी झाल्यास सेवेतील अडचणी लक्षात येऊन त्यात पालट करता येईल’, या विचारामुळे चालक म्हणून सेवा करणे आणि स्वतःतील प्रेमभाव वाढवण्यासाठी साहाय्य होऊन सेवेतील आनंदही मिळणे : त्यानंतर कोणत्याही साधकाला आणायचे किंवा पोचवायचे नियोजन असल्यास ‘त्यांना कुठे पोचवणे ? किंवा कुठून आणणे ?’, हे त्यांना सोयीचे होईल’, असा माझा विचार होऊ लागला, तसेच ‘मी केवळ नियोजन न करता चालक म्हणून त्या सेवेत सहभागी झालो, तर सेवेतील अडचणी लक्षात येऊन त्यात पालट करता येईल’, या विचारामुळे मी नियमित चालक म्हणून सेवाही करत होतो. ‘साधकांना आणणे आणि पोचवणे’, हे साधकांना सुलभ कसे होईल’, हे मी संबंधित साधकांशी बोलून घेत असे. तेव्हा माझ्या मनात ‘सेवाही पूर्ण झाली पाहिजे आणि कोणताही ताण न घेता, दुसर्‍यांना अडचण येऊ न देता साहाय्य करायचे’, असा विचार असे. यामुळे माझ्यातील प्रेमभाव वाढवण्यासाठी साहाय्य हाेऊन मला सेवेतील आनंदही मिळाला.

४. अनुभूती

४ अ. ‘वाहन दुरुस्ती करणारा साधक आश्रमात असतांनाच वाहन बंद पडणे : काही वेळा वाहनामध्ये दुरुस्ती करावी लागते; मात्र मी आणि श्री. अमित हावळ आम्ही दोघे आश्रमात असतांना कोणतीही गाडी बंद पडायची नाही. ज्या साधकाला वाहनाची दुरुस्ती करता येते, तो साधक आश्रमात आल्यावरच वाहन बंद पडत असे. अन्य वेळी वाहन कधीही बंद पडले नाही. ‘ही देवाचीच कृपा आहे’, असे माझ्या लक्षात आले.

४ आ. ४ मासांच्या कालावधीतील स्वतःकडील काही सेवा वेळेअभावी करणे शक्य न झाल्याने ताण येणे

४ आ १. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकाने सांगितल्याप्रमाणे त्याच रात्री देवाला आत्मनिवेदन करणे अन् त्याच्या दुसर्‍याच दिवशी वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व पहाणार्‍या साधकाने आश्रमात येत असल्याविषयी सांगणे : वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व पहाणारा साधक १५ दिवसांसाठी घरी गेला होता; मात्र घरातील अडचणींमुळे त्याला ४ मास आश्रमात येता आले नाही. मी मार्च ते जून २०२३ या कालावधीत वाहनसेवेचे नियोजन पहात होतो. त्या कालावधीत मला वेळेअभावी माझ्याकडील काही सेवा करणे शक्य झाले नाही. त्या वेळी मला थोडा ताण आला. तेव्हा माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकाने मला देवाला आत्मनिवेदन करून शरण जाण्यास सांगितले. त्याच रात्री मी देवाला आत्मनिवेदन करून प्रार्थना केली, ‘देवा, तुला माझ्याकडून वाहनाशी संबंधित सेवा जितके दिवस करायची आहे, तितके दिवस तू करून घे. माझे काही शिकायचे राहिले असल्यास या सेवेच्या माध्यमातून तेही तूच मला शिकव आणि माझ्याकडील अन्य सेवेचा मला ताण येऊ न देता त्या सेवाही नियोजित वेळेत पूर्ण करून घे.’ मी असे आत्मनिवेदन केल्याच्या दुसर्‍याच दिवशी वाहनाशी संबंधित सेवेचे दायित्व पहाणार्‍या साधकाने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी २ दिवसांनी आश्रमात येत आहे.’’

४ आ २. त्याच काळात प्रलंबित सेवेच्या संदर्भातील काम करणारी संबंधित व्यक्ती रुग्णाईत असल्याने ती कार्यालयात न येणे अन् त्या व्यक्तीने ‘काही दिवसांनी तुमचे काम पूर्ण करतो’, असे सांगणे : त्यानंतर माझ्या बाहेरच्या प्रलंबित सेवेच्या संदर्भात माहिती घेतांना मी संबंधित व्यक्तीला भ्रमणभाष केला असता तिने सांगितले, ‘‘मी रुग्णाईत असल्याने पुष्कळ दिवस कार्यालयात गेलो नाही. त्यामुळे तुमचे काम पाहिले नाही. मी काही दिवसांनी तुमचे काम पूर्ण करतो.’’ मला माझ्याकडील काही सेवा प्रलंबित राहिल्याने आलेला ताण त्या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यावर दूर झाला.

५. कृतज्ञता : आश्रमातील चालक साधक आणि आश्रमाच्या बाहेर रहाणारे चालक साधक यांनी मला अनेक वेळा त्यांची सेवा आणि नोकरी सांभाळून सेवेत साहाय्य केले. त्याबद्दल मी त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ‘मला प्रत्येक प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवता आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

६. प्रार्थना : ‘प.पू. डॉक्टर, ‘मला प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करायची आहे’, ही जाणीव माझ्या अंतर्मनात अखंड राहू दे’, अशी मी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

– श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन संकुल, देवद, पनवेल. (१५.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक