डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 


कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात दोषारोपत्र क्रमांक ३,४ आणि ५ मध्ये संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हेच मुख्य सूत्रधार असल्याचे अनेक पुरावे आहेत. डॉ. तावडे यांनीच या हत्येचा कट रचला, मारेकर्‍यांना शस्त्रे पुरवली, तसेच त्यांना प्रशिक्षण देणे आणि अन्य गोष्टी केल्या. डॉ. तावडे हे जर जामिनावर बाहेर राहिले, तर ते साक्षीदारांवर दबाव टाकणे, पुराव्यांशी छेडछाड करणे, असा प्रकार करू शकतात. त्यामुळे ‘डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित करावा’, असा युक्तीवाद विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी केला.

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्. एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकार पक्षाच्या वतीने शिवाजीराव राणे उपस्थित होते. या प्रकरणी संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता प्रीती पाटील उपस्थित होत्या. कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात स्थानिक न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत केला आहे. या प्रकरणी जामीन रहित करण्यासाठी सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. तेथील आवेदन मागे घेऊन परत सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.