अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !
१. पूर्वीच्या कृषीविषयक ग्रंथातील उल्लेख !
पराशरऋषींनी रचलेल्या ‘कृषिपराशर’ या ग्रंथातही ‘वैशाखे वपनं श्रेष्ठम् ।’ म्हणजे ‘वैशाख मासात केलेली पेरणी सर्वश्रेष्ठ आहे.’ असा उल्लेख आढळतो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लागवड करणे शक्य न झाल्यास वैशाख मासात उन्हाळी भाज्यांची लागवड करण्याचा प्रयत्न करावा.
२. लागवड करण्यापूर्वी पूर्वसिद्धता कशी करावी ?
अ. पालापाचोळा, घनजीवामृत आणि माती यांचे मिश्रण करावे अन् त्यावर पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. हे मिश्रण ४८ घंटे झाकून ठेवावे. ४८ घंटे झाल्यावर या मिश्रणाने आपल्याकडील कुंड्या किंवा वाफे भरून ठेवावेत. या मिश्रणातील ओलावा टिकून राहील, इतके पाणी त्यावर नियमित शिंपडावे.
आ. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार ‘कोणकोणता भाजीपाला लावणार ?’, हे निश्चित करून त्यांचे बियाणे आणून ठेवावे. भाज्यांची निवड करतांना ‘एकदल-द्विदल अशी मिश्र लागवड करायची आहे’, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. ‘या कालावधीत कोणती लागवड करू शकतो ?’, याची सूची लेखात पुढे दिली आहे.
इ. वेलवर्गीय भाज्यांच्या वेली चढवण्यासाठी मांडव करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मांडवाची जागा निश्चित करून वेलवर्गीय भाज्या लावण्याचे नियोजन करावे.
ई. पेरणीपूर्वी न्यूनतम तीन दिवस आधी जीवामृत तयार करावे, म्हणजे नवीन बियाणे पेरल्यावर अथवा रोपे लावल्यावर त्यांना जीवामृत देता येईल. बीजसंस्कार करून रोपे आणि बिया लावण्यासाठी पेरणीपूर्वी २४ घंटे आधी बीजामृत तयार करून ठेवावे.
उ. रोपवाटिकेतून आणून फळझाडे किंवा औषधी वनस्पती यांची रोपे लावायची असल्यास ती अक्षय्य तृतीयेपूर्वीच आणून ठेवावीत.
‘वरील सर्व कृती नेमकेपणाने कशा कराव्यात ?’, याविषयीची विस्तृत माहिती देणारे लेख आणि माहितीपट सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांच्या मार्गिका (लिंक) बाजूच्या चौकटीत दिल्या आहेत.
३. अक्षय्य तृतीयेला पुढील भाजीपाल्यांची लागवड करू शकतो
३ अ. वेलवर्गीय भाज्या : दुधी भोपळा, दोडकी, कारले, काकडी, भोपळा, तसेच तोंडली इत्यादी
३ आ. कंदभाज्या : अळू, आले, हळद, आंबेहळद आणि सुरण इत्यादी
३ इ. फळभाज्या : वांगी, मिरची, सिमला मिरची आणि भेंडी इत्यादी
३ ई. शेंगभाज्या : गवारी, शेवगा, सर्व प्रकारचे घेवडे आणि पावटे इत्यादी
याबरोबरच मका, कढीपत्ता, विविध फळझाडे आणि औषधी वनस्पती यांचीही रोपे या कालावधीत लावू शकतो.
४. अक्षय्य तृतीयेला लागवड करून कृषीपरंपरा जतन करूया !
या सर्व भाज्यांची लागवड अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किंवा वैशाख मासात केल्यामुळे पुढील १ – २ मासात त्यांची चांगली वाढ होते. आषाढाच्या आरंभी पाऊस चालू झाल्यास तोपर्यंत रोपे मोठी झाल्याने ती वारा आणि पाऊस यांत तग धरू शकतात.
‘अकितीला आळं, तर बेंदराला फळं’ या म्हणीनुसार ‘अक्षय्य तृतीयेला केलेल्या लागवडीतून आषाढ पौर्णिमेच्या काळात येणार्या ‘बेंदूर’ या सणापर्यंत फळे मिळण्यास आरंभ होतो’, असे परंपरेने भारतीय शेतकरी मानत आला आहे. आपणही या दिवशी लागवड करून या कृषीपरंपरा जतन करूया !
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)
मृतिका पूजन
सदोदित कृपादृष्टी ठेवणार्या मृतिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस !
१. मातीत आळी घालणे आणि पेरणी
पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा आणि या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतभूमीचे अक्षय्य तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतभूमीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या भूमीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास आरंभ केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते आणि कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वतःला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
२. वृक्षरोपण
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.
– ब्रह्मतत्त्व (८.५.२००५, सायंकाळी ४.४४)
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी किंवा शेतात बियाणे पेरून लागवड करा ! |
जीवामृत आणि बीजामृत बनवण्याची पद्धत, तसेच कुंडी अन् वाफे कसे भरावेत :
https://www.sanatan.org/mr/a/82985.html विविध भाज्यांची लागवड कशी करावी ?, तसेच भाज्यांसाठी मांडव सोप्या पद्धतीने कसा करावा ? |