सण असे साजरे करून पहा…!
सण म्हणजे मौजमजा. सण म्हणजे चांगलेचुंगले खाणे-पिणे, सण म्हणजे भारीतले कपडे, सण म्हणजे खरेदी, सण म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमवेत गप्पागोष्टी … अशी सध्याची सणाची व्याख्या झाली आहे.
आता सर्वत्र हिंदु राष्ट्राचा जयघोष चालू झाला आहे. या ‘हिंदु राष्ट्रात सण खर्या अर्थाने साजरे होतील’, असे म्हटले जाते. ‘खर्या अर्थाने’ म्हणजे काय ?
सध्याच्या सणांमध्ये मौजमजा, व्यावसायिकता आणि आधुनिकता यांच्या नावाखाली शिरलेले अपप्रकार ‘साजरे’ करण्याची मानसिकता पालटून त्या दिवशी ईश्वराच्या चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी त्याच्या अस्तित्वाची जाणीव सतत मनात ठेवायचा प्रयत्न करणे, सणाच्या दिवशीचे चैतन्य अनुभवण्याची तळमळ मनात ठेवून ते अनुभवता येणे म्हणजे सण खर्या अर्थाने साजरा करणे ! हिंदूंच्याच सणाला देवतेचे अधिकाधिक चैतन्य पृथ्वीतलावर येण्याची साक्षात् देवाचीच योजना आहे. हे चैतन्य आपण कसे अनुभवणार ?
१. या दिवशी करावयाच्या धार्मिक विधींचे धार्मिक महत्त्व आणि त्याचे आध्यात्मिक लाभ आधीच जाणून घ्या !
…त्यामुळे तुमच्या मनात धर्माभिमान आणि ईश्वराप्रतीचा भाव निर्माण होईल !
२. या दिवशी करायच्या धार्मिक विधीसाठी लागणार्या सर्व साहित्याची सिद्धता, तो जिथे करायचा त्या जागेची स्वच्छता, त्यासाठी लागणार्या नैवेद्याची पूर्वसिद्धता, स्वतः परिधान करायच्या पोषाखाची सिद्धता या सार्या गोष्टी ईश्वरी चैतन्य मिळण्यासाठी, ‘देव साक्षात् घरी येणार आहे’, हा भाव मनात ठेवून करा !
… त्यामुळे आदल्या दिवशीपासूनच सणाच्या दिवशी मिळणारे चैतन्य अनुभवता येईल !
३. या दिवशीची घर सजावट, पोषाख, खाद्यपदार्थ, आप्तेष्टांमध्ये मिसळणे हे ‘सारे बडेजाव म्हणून नव्हे, तर सारे काही ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्यासाठी आहे’, असा भाव मनात ठेवायचा प्रयत्न करा !
… यामुळे दिवसभरील प्रत्येक प्रसंगात ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवता येऊन त्याचे चैतन्य ग्रहण करता येईल !
४. दरवाजात झेंडूचे फूल आणि आंब्याचे पान एकाआड एक करून तोरण लावा !
… झेंडू आणि आंब्याच्या पानातील चैतन्य कार्यरत होऊन त्या दिवशी वाढलेले चैतन्य त्यात मिसळून अधिक चैतन्य कार्यरत होऊन त्याचा आपल्याला लाभ होतो.
५. रांगोळी काढतांना त्यामधून ‘त्या सणाशी संबंधित देवतेचे तत्त्व कार्यरत करायचे आहे’, हा भाव ठेवून संबंधित देवतेचे तत्त्व किंवा अस्तित्व जाणवेल, अशी रांगोळी अत्यंत भावपूर्ण काढा !
… त्यामुळे त्या सणाशी संबंधित देवतातत्त्व कार्यरत होऊन सर्वांना त्याचा लाभ होईल !
६. त्या दिवशीचा स्वयंपाक किंवा गोड पदार्थ बनवतांना ‘ईश्वर प्रत्यक्ष तो ग्रहण करणार आहे’, या भावाने प्रार्थना करून आणि नामजप करत बनवा !
… त्यामुळे ईश्वराचे चैतन्य त्या पदार्थांमध्ये मिसळून तो ‘नैवेद्य’ होईल !
७. सणाच्या दिवशीचा धार्मिक विधी करतांना ‘देव समोरच आहे आणि आपण देवाला संपूर्ण शरण जाऊन एक एक कृती करत एकाग्रतेने देवाचे चैतन्य ग्रहण करत आहोत’, असा भाव ठेवा !
… त्यामुळे ईश्वराचे चैतन्य कार्यरत होऊन आपले स्थूल आणि सूक्ष्म देह अन् मन शुद्ध झाल्याची अनुभूती घेता येईल !
८. या दिवशी भोजन ग्रहण करतांना ‘तो देवाचा महाप्रसाद त्याला भरवत आहोत आणि आपण ग्रहण करत आहोत’, असा भाव ठेवा !
… यामुळे सतत ईश्वराचे सान्निध्य अनुभवता येऊन आनंदात वृद्धी होईल ! – सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, पनवेल.
सणाच्या दिवशी आप्तेष्ट एकत्र आल्यावर संपूर्ण दिवसभर अधिकाधिक ईश्वराचे चिंतन, पूजन, नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आदी सत्संग, कीर्तन, कथा, एकमेकांना अनुभूती सांगणे यांसारख्या कुठल्या कुठल्या माध्यमातून करता येईल, याचे नियोजन करा !