१० मे १८५७ चे स्मरण !
|
‘१० मे १८५७…. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करण्यासाठी हिंदुस्थानच्या रणांगणावर हुतात्म्यांनी पहिली स्वातंत्र्य मोहीम चालू केली ती याच दिवशी ! या उठावाने हिंदुस्थानातील गोरे अधिकारी आणि इतिहासकार यांना अनेक धडे शिकवले. त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा धडा हा की, ‘मनात आणले, तर येथील ब्राह्मण आणि शुद्र, हिंदु अन् मुसलमान सारे एक होऊन क्रांती घडवू शकतात’; कारण वरवर भिन्न भासले, तरी ते एकमेकांना जाणून घेतात आणि एकमेकांशी समरस होतात. या प्रेरणेतूनच पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अजरामर ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ते लिहितात, ‘‘या युद्धामुळे भारताची प्रगती तर खुंटली नाहीच; पण याउलट आपण इंग्रजांविरुद्ध फार मोठा उठाव कसा केला, याचा एक आदर्श भावी काळासाठी निर्माण केला गेला.’’
१. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या उठावाचे महर्षि स्वामी दयानंद हेच खरे सूत्रधार !
वर्ष २००७ म्हणजेच या वर्षी या क्रांतीकारी घटनेला १५० वर्षे पूर्ण होतील. (१० मे २०२४ या दिवशी १६७ वर्षे पूर्ण होत आहेत. – संकलक) त्या निमित्ताने या घटनेचा पुन्हा एकदा इतिहासकारांनी मागोवा घ्यायला हवा. त्यासाठी नव्याचा शोध घेत जुने ग्रंथ भांडारेही धुंडाळणे आवश्यक आहे. आज अशी अनेक ग्रंथ भांडारेही दुर्लक्षित अवस्थेत आहेत. देहलीपासून मुंबईपर्यंत अशी अनेक वाचनालये (लायब्ररीज) आहेत. यातीलच सर्वांत महत्त्वाच्या वाचनालये (लायब्ररीज) आर्य समाजाच्या मालकीच्या आहेत. आज तेथील पुस्तके ही वाळवींच्या उदरनिर्वाहाचेच जणू साधन बनलेले आहे.
अशाच एका ग्रंथालयात मला एक महत्त्वाचे पुस्तक सापडले. पुस्तक नव्हेच ते जणू प्रस्थापित इतिहासाला हादरवणारा बाँबगोळाच… या ग्रंथात (‘हमारा राजस्थान’ – लेखक : पृथ्वीसिंह मेहता, विद्यालंकार) पृ.क्र. २६७-६८ मध्ये लेखकाने वर्ष १८५७ च्या प्रस्फोटासंबंधी असंख्य धक्कादायक पुराव्याची जणू जंत्रीच जोडलेली आहे. या पुराव्यांतील सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष, म्हणजे या उठावाची सिद्धता सुमारे ३ वर्षे अगोदरच आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांच्या नेतृत्वाखाली चाललेली होती आणि हेच महर्षि स्वामी दयानंद हे या उठावाचे खरे सूत्रधार होते.
२. स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व आणि योगदान यांमध्ये साधू-संन्यासींचा महत्त्वाचा सहभाग
या पुस्तकातील पुराव्यांना अधिक बळकटी देणारे दुसरे पुस्तक, म्हणजे ‘दयानंद सरस्वती – हिज लाईफ अँड आयडियाज्’ (Dayanand Saraswati – His life and Ideas) (लेखक : डॉ. जोर्डन्स) या मौलिक ग्रंथाच्या परिशिष्टात (‘स्वामी दयानंद और सिपाही विद्रोह’) हाच विषय हाताळण्यात आलेला आहे. या आणि अन्यही तत्कालीन पुस्तकांत यासंबंधीचे पुरावे सापडतात. बहुसंख्य पुस्तकात या संग्रामाचे नेतृत्व स्वामी दयानंद, ओमानंद, पूर्णानंद आणि विरजानंद या योद्धा संन्याशांनी केल्याचे आढळते.
वर्ष १८५७ च्या विस्फोटात साधू संन्यास्यांचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे दिसून येते. (संदर्भ : ‘मरियम – १८५७ के भारतीय गदर की कहानी’) सीताराम बाबा हा असाच एक संन्यासी. हा सीताराम बाबा आणि त्याचे सहकारी साधू संन्यासी यांच्या संपर्कासाठी लागणारा पत्रव्यवहार हा त्यांच्या कफनीमध्ये दडलेला असे. दुर्दैवाने सीताराम बाबा पुढे इंग्रजांकडून पकडले गेले. १८ ते २५ जून १८५७ पर्यंतच्या ८ दिवसांत त्यांची कसून जबानी घेण्यात आली. ही ५८ पानांची खळबळजनक जबानी लोकांसमोर आल्यास या उठावासंबंधी आजवर केलेल्या संशोधनात फार मोठी भर पडू शकते.
या जबानीतील महत्त्वाचे वाक्य म्हणजे ‘वर्ष १८५७ का विस्फोट एक सुनिश्चित योजना का परिणाम था, जिसके रचयिता एक वृद्ध साधू थे…’ अर्थात् ‘हा वृद्ध साधू, म्हणजे स्वामी दयानंद होय’, हे पुढे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
साधू संन्यासी यांच्या कफनीमध्ये दडलेला पत्रव्यवहार शोधून काढण्यात दुर्दैवाने इंग्रजांना यश आले; मात्र अशा असंख्य अज्ञात सीताराम बाबांसारख्या क्रांतीकारकांच्या जबान्या पुन्हा कोण खणून काढणार ? जेणेकरून सत्य लोकांसमोर येईल आणि भावी पिढीसमोर ‘केवळ मूठभर मीठ उचलून स्वातंत्र्य मिळते’, हा आदर्शवाद वास्तवात खोटा असल्याचे दिसून येईल.’
(साभार : ‘स्वातंत्र्यवीर’, ११ मे २००६)