Kulgam Encounter : काश्मीरमधील कुलगाममध्ये ४० घंट्यांनंतर चकमक संपुष्टात : ३ आतंकवादी ठार
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेली चकमक ४० घंट्यांनंतर संपुष्टात आली. या चकमकीत सुरक्षादलाच्या सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना ठार मारले. ६ मेच्या रात्री उशिरा कुलगामच्या रेडवानी भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू झाली होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाची सहकारी संघटना समजली जाणार्या ‘टी.आर्.एफ्.’चा मुख्य कमांडर बासित अहमद दार आणि त्याचा सहकारी फहीम अहमद बाबा मारले गेले.
१. या भागात बासित अहमद दार, फहीम अहमद बाबा आणि मोमीन हे तीन आतंकवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने संपूर्ण परिसराला वेढा दिला होता.
२. अहमद दार आणि त्याचा सहकारी फहीम अहमद बाबा या दोन्ही आतंकवाद्यांना मारल्यानंतर चकमक संपुष्टात आली होती; मात्र त्यानंतर तेथील घरांची झडती घेत असतांना सैनिकांवर लपून बसलेल्या आतंकवाद्याने गोळीबार केला. त्यानंतर चकमक पुन्हा चालू झाली.
३. ठार करण्यात आलेला बासिक दार हा पोलीस आणि निरपराध नागरिक यांच्या हत्येमध्ये सहभागी होता. काश्मीरमधील अल्पसंख्यांकांवर आक्रमण करण्याचा कट त्याने रचला होता. तो सुरक्षादलांना हवा असलेला आतंकवादी होता. त्यामुळे त्याचा खात्मा होणे, हे सुरक्षादलांचे मोठे यश आहे’, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही.के. बिरधी यांनी दिली आहे.