Goa Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरेत १ लाख,  तर दक्षिणेत ६० सहस्र मताधिक्य मिळणार !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा !

पणजी, ८ मे (वार्ता.) : गोव्यात झालेल्या विक्रमी मतदानाचा लाभ भाजपला होणार आहे. यामुळे उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक १ लाख, तर दक्षिण गोव्यातून सौ. पल्लवी धेंपे ६० सहस्र एवढ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ८ मे या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.

काँग्रेसकडून धर्म आणि जात यांच्या नावाने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात उष्णता असूनही लोक मतदानासाठी घरातून बाहेर पडले आणि यासाठी मी त्यांचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विकासासंबंधी काहीच बोलला नाही, तर काँग्रेसने धर्म आणि जात यांच्या नावाने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपवर आणि माझ्यावर खोटे आरोप केले. अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय यांमधील एकादोघांना पुढे काढून पूर्ण समाज भाजपविरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मतदार हुशार आहेत आणि काँग्रेसचे फुटीचे राजकारण ते स्वीकारणार नाहीत.’’

निवडणुकीनंतर ‘इंडि’ आघाडी विस्मरणात जाईल !

सावंत पुढे म्हणाले, ‘‘या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष केवळ ४ मतदारसंघांपुरता शिल्लक रहाणार आहे. याउलट भाजप उत्तर गोव्यात २०, तर दक्षिण गोव्यात १४ मतदारसंघांमध्ये आघाडीवर रहाणार आहे. दक्षिणेत ६ मतदारसंघांमध्ये आम्ही अल्प पडलेलो असलो, तरी सांगे, सावर्डे, मडकई, काणकोण आणि शिरोडा या मतदारसंघांतून मिळणार्‍या आघाडीमुळे ही तूट आम्ही भरून काढू. निवडणुकीनंतर ‘इंडि’ आघाडी विस्मरणात जाणार आहे.’’

पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक