(म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर श्रीराममंदिराचे शुद्धीकरण करू !’ – नाना पटोले
मुंबई – इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही श्रीराममंदिराचे शुद्धीकरण करू. आमच्या सनातन धर्माच्या ४ शंकराचार्यांनी या विधीला विरोध केला होता. त्यामुळे ४ शंकराचार्यांना आम्ही बोलावू आणि श्रीराममंदिराचे शुद्धीकरण करून घेऊ, तसेच त्या मंदिरात आम्ही श्रीराम दरबार स्थापन करू; कारण आता त्या मंदिरात श्रीराम दरबार नाही. मूळ जी मूर्ती बाजूला सारण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार मंदिरात सजवू. जो विधी झाला तो धर्माला धरून झाला नाही. आम्ही सुधारणा करू. धर्माच्या आधारावर सुधारणा करू, अधर्माच्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले, ते अधर्माच्या आधारावर केले, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. (ज्याविषयी काही ठाऊक नाही, त्याचा आधार घेऊन हिंदूंची दिशाभूल करायला निघालेली काँग्रेस ! निधर्मी काँग्रेसच्या नेत्यांना धर्म, अधर्म असे शब्द उच्चारणे शोभत नाही ! शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा विधीला विरोध केला, असा भ्रम काँग्रेसनेच पसरवला होता. प्रत्यक्षात हे मंदिराचे पुनर्निमाण आहे, नवीन मंदिर नाही, त्यामुळे शास्त्राप्रमाणे सर्व विधी योग्य होता ! – संपादक)
२२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वरील विधान केले आहे.
पटोले पुढे म्हणाले की, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमधील भाषणात म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आली, तर ते त्यांनी आणलेल्या योजना काढून घेतील. श्रीराममंदिरही त्यात आले. गहू आणि तांदुळ देतात ती योजनाही आमचीच आहे. आम्ही काही त्या योजना बंद करणार नाही, तसेच गरिबांना आम्ही प्लास्टिकचे तांदुळ देणार नाही. योग्य प्रमाणात अन्न, धान्य आणि साखर देऊ.
|