पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद !

नियमित समयमर्यादेपेक्षा अधिक वेळ बँक चालू ठेवली, आचारसंहितेचा भंग केला !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – नियमित समयमर्यादेपेक्षा अधिक वेळ बँक (अधिकोष) चालू ठेवली. आचारसंहितेचा भंग केला, या कारणास्तव पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (पीडीसीसी) वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक तेलवाडे यांच्यावर गुन्हा नोंद  करण्यात आला आहे. वेल्हे तालुक्यातील भरारी पथकाचे प्रमुख रमेश बेलेकर, कृषी साहाय्यक वेल्हे कृषी विभाग यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

वेल्हा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. ती ६ मे या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत चालू होती. त्या वेळी बँकेमध्ये ४० ते ५० अनोळखी व्यक्ती ये-जा करत असल्याची चित्रफीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली. या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याची नोंद घेत निवडणूक आयोगाने बँक व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद केला आहे.