महाराष्ट्रात मे महिन्यात अवेळी पावसाचा जोर वाढणार !
मुसळधार पाऊस अन् गारपीट होण्याचा अंदाज !
मुंबई – हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात ११ मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज नोंदवला आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या झळा बसत आहेत, तर काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असून तेथील कांदा उत्पादक शेतकर्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकणातही ८ मे ते ११ मे या कालावधीत पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसांत मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील ५ दिवस विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट, विजांच्या कडकडाट ३०-४० प्रतितास सोसाट्याच्या वार्याची चेतावणी दिली आहे, तर पुढील २ दिवस विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ (धोक्याची सूचना) जारी केला आहे.
हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने ८ मे या दिवशी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, येथे गारपीट, अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास ४०-५० प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून दिला आहे. |