क्रांती म्हणजे…
‘क्रांती म्हणजे प्रचलित राज्य पद्धतीच्या विरोधात केलेले सशस्त्र बंड ! प्रचलित राज्यपद्धत, म्हणजे शासक आणि शासन यांनी अवलंबलेले धोरण होय. थोडक्यात ‘एखाद्या राज्यात राज्यकर्त्यांची धोरणे प्रजाहित विरोधी आहेत’, असे जेव्हा प्रजेतील काही व्यक्तींना किंवा संपूर्ण प्रजेला वाटू लागते आणि त्या विरोधात या व्यक्ती सशस्त्र लढा पुकारतात याला ‘क्रांती’, असे नाव आहे.
१. क्रांती कधी केली जाते ?
‘राज्यकर्ते जर एतद्देशीय (देशातील) असतील आणि जुलमी असतील, तरीही त्यांचा नाश झाला पाहिजे’, असे आर्य चाणक्य यांनी प्रतिपादन केले आहे. जर राज्यकर्ते आणि प्रजा सामर्थ्याने तुल्यबळ असतील, तरच त्यांच्यात वाटाघाटी होऊ शकतात; पण जेथे अन्याय, जुलूम हेच राज्यकर्त्यांचे मार्ग आहेत, तेथे प्रजेला प्रत्युत्तरासाठी शस्त्र हाती धरणेच भाग पडते.
२. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धापूर्वीची स्थिती
राज्यकर्ते जर परकीय असतील, तर मग सशस्त्र लढ्याविना मार्गच उरत नाही; कारण केवळ मनुष्यहानीची भीती न रहाता संपूर्ण एतद्देशीय संस्कृतीला आणि परंपरेला धोका निर्माण होतो. किंबहुना अशा संघर्षाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होते आणि परकीय जुलमी राजवटीत स्वधर्म संकटात सापडतो. या पार्श्वभूमीवर आपण दीडशे वर्षांपूर्वीची हिंदुस्थानातील स्थिती पाहिली, तर वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील पराभवाने पिचून गेलेली जनता आपल्याला दिसते. वर्ष १८२० पासून इंग्रजी सत्तेच्या प्रभावातील परकियांचे जुलमी राज्य नशिबाचा एक भाग म्हणून स्वीकारलेले होते. इंग्रजी राजवटीत शिक्षण पद्धतीतून निर्माण झालेल्या काही देशद्रोह्यांची ‘इंग्रजी शिक्षण पद्धत वरदान आहे’, अशीच विचारसरणी होती. इंग्रजी शासन केवळ जुलमी नव्हते, तर अकार्यक्षमही होते. वर्ष १८४० ते १८८० च्या काळात या अकार्यक्षम शासनामुळे हिंदुस्थानातील प्राचीन ग्रामव्यवस्था नष्ट झाली किंवा केली गेली आणि शेतकरी, कारागीर यांच्या पिढ्या देशोधडीला लागल्या. चुकीच्या करवसुली पद्धतीमुळे उद्योगधंदे बंद पडले. उत्पादन घटले. बेकारी वाढल्यामुळे गुंडगिरी, चोर्या वाढल्या आणि जनतेची आर्थिक स्थिती खालावली. या परिस्थितीत पांढरपेशा समाजाने केवळ तटस्थपणाची भूमिका स्वीकारली. त्यासाठी इंग्रजांनी केलेल्या धार्मिक आणि राजकीय खेळी यशस्वी ठरल्या.
इंग्रजांनी प्रसृत केलेला गैरसमज, म्हणजे ‘इस्लामी राज्यकर्त्यांकडून हिंदुस्थान घेतला’, हा होय. वास्तवात मुसलमानी आणि हिंदु राजे यांच्याकडून निरनिराळे प्रांत घेतले.
३. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम
आपला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन आता ७६ वर्षे होत आहेत. वर्ष १९४७ पूर्वी सुमारे १२५ वर्षे आपला देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध पहिले स्वातंत्र्ययुद्ध १७ मे १८५७ या दिवशी चालू झाले. इंग्रज सत्तेविरुद्ध स्वातंत्र्ययोद्धे २ मार्गांनी लढत होते.
अ. अर्ज, विनंती, निषेधाचे ठराव किंवा असहकार इत्यादी हा एक सनदशीर मार्ग.
आ. फाशीच्या तख्तावर चढून आत्मबलीदान करून इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचारी शासनाविरुद्ध सार्या जगाला जाग देणारा सशस्त्र क्रांतीकारकांचा दुसरा मार्ग.
वर्ष १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध १ वर्षानंतर संपुष्टात आले; पण त्या दाहकतेने प्रकट झालेली स्वातंत्र्यज्वाला लक्ष्यापूर्वीच्या अभावी नाहीशी झाली नाही. ती सतत वाढतच होती की, ज्यामुळे इंग्रजांनी या भूमीतून पाय काढता घेऊन प्रत्यक्ष साम्राज्य चालवणे अशक्य झाले. यामुळे आपल्या विश्वासातील एतद्देशीयांच्या स्वाधीन करण्यापर्यंत देशभर वर्ष १८५७ च्या धर्तीवर लहान मोठ्या प्रमाणात क्रांतीचे स्फोट होत आले. या अखंड चाललेल्या रणयज्ञात किती राष्ट्रभक्तांची आहुती पडली, याची गणना करणे कठीण आहे. या अगणित विरांची मालिका स्वातंत्र्यदेवीच्या चरणी अर्पण झाल्यावरच इंग्रजांचे अस्तित्व प्रत्यक्ष शासक या नात्याने या भूमीतून नष्ट झाले. या सर्व महापुरुषांचे स्मरण करणे आणि त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून भारत राष्ट्राच्या उत्थानार्थ त्यांनी जसे आत्मसमर्पण केले, तसे करण्याने त्यांच्या जीवनातून आपण कळत नकळत स्फूर्ती घेतो, ध्येयवाद स्वीकारतो आणि राष्ट्राची मान उंचावण्याचा प्रयत्न करतो.’
– श्री. शंकर दत्तात्रय गोखले, अध्यक्ष आणि संपादक, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई.
(साभार : ‘स्वातंत्र्यवीर’, ३ मे २००६)