UK Researchers Reconstructed Face : ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या महिलेचा चेहरा आला समोर; शास्त्रज्ञांनी लावला मोठा शोध !
मुंबई – ब्रिटनमधील पुरातत्व तज्ञांच्या पथकाने ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या ‘निएंडरथल’ महिलेचा चेहरा सिद्ध केला आहे. या महिलेचा चेहरा कवटी वापरून सिद्ध करण्यात आला आहे. ही कवटी वर्ष २०१८ मध्ये सापडली होती.
एका वृत्तानुसार या महिलेचे नाव शनिदर झेड आहे; कारण तिची कवटी इराकमधील कुर्दिस्तानमधील एका गुहेत सापडली होती. या शोधातून ४० हून अधिक निएंडरथल महिलांविषयीही माहिती उपलब्ध झाली आहे. या महिला एका मोठ्या दगडाच्या चिन्हाखाली झोपलेल्या स्थितीत आढळल्या.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, हा चेहरा उरलेल्या सांगाड्याचा वापर करून सिद्ध करण्यात आला आहे. या सांगाड्याची हाडे ओल्या बिस्किटासारखी नाजूक झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
बनविले चेहर्याचे ‘थ्रीडी मॉडेल’
सांगाड्याच्या नाजूक परिस्थितीमुळे हा चेहरा सिद्ध करणे हे तज्ज्ञांसाठी मोठे आव्हान होते. त्यासाठी त्याने आधी त्याच्या तुकड्यांना थोडी ताकद दिली. त्यानंतर त्यांचा वापर करून ‘थ्रीडी मॉडेल’ सिद्ध करण्यात आले. शेवटचे निएंडरथल्स ४० सहस्र वर्षांपूर्वी गूढपणे मरण पावले असे म्हणतात.
शतकातील निएंडरथलचा सर्वोत्तम नमुना
शनिदर झेडची कवटी दोन सेंटीमीटर सपाट असल्याची म्हणजे दडपली गेल्याची आढळून आली. त्यावर काही दगड पडल्याने हा प्रकार घडल्याचे मानले जात आहे आणि हे त्या महिलेच्या मृत्यूनंतर लगेचच घडले असावे; पण तरीही तो या शतकात सापडलेला निएंडरथलचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. शनिदर झेडच्या सांगाड्याचा खालचा भाग १९६० मध्ये बाहेर काढण्यात आल्याचे मानले जाते. हा शोध अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञ राल्फ सोलेकी यांनी लावला आहे.