भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !
‘भारतीय शास्त्रीय नृत्यातून निर्माण होणार्या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते. चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची (सर्वाेच्च आणि सातत्याने मिळणार्या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने भारतीय शास्त्रीय नृत्य, तसेच पाश्चात्त्य नृत्य यांच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.
‘व्यक्तीने नृत्य केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे काही चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.
१. चाचण्यांतील नोंदी
वरील नोंदींतून दिसून आले की, व्यक्तींनी भारतीय शास्त्रीय नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. याउलट त्यांनी पाश्चात्त्य नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
२. निष्कर्ष
यातून ‘भारतीय शास्त्रीय नृत्य केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तिने पाश्चात्त्य नृत्य केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो’, हे लक्षात आले.
३. पाश्चात्त्य नृत्यातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे
पाश्चात्त्य नृत्यप्रकारांना आध्यात्मिक पाया नाही. हे नृत्यप्रकार आणि त्यांच्याशी संबंधित घटक (उदा. वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, पाश्चात्त्य संगीत इत्यादी) असात्त्विक असल्याने त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली. या नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘हे नृत्य केल्यानंतर त्यांना शारीरिक थकवा येणे, डोके दुखणे, काही न सुचणे इत्यादी त्रास झाले.’
४. भारतीय शास्त्रीय नृत्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होणे
भारतीय शास्त्रीय नृत्याला आध्यात्मिक पाया आहे. भरतनाट्यम्, कथ्थक इत्यादी नृत्यप्रकार सादर करतांना सात्त्विक वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा यांचा अंतर्भाव असून त्यांना सात्त्विक शास्त्रीय संगीताची जोड दिली जाते. या नृत्यांतील पदन्यास, तसेच हातांच्या मुद्रा या सात्त्विक अन् लयबद्ध आहेत. ही नृत्ये देवतांच्या कथांवर आधारित किंवा देवतांशी संबंधित असल्याने नृत्य करणार्याच्या मनात आणि मुखावर सात्त्विक भाव असतात. नृत्याच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान साधले जात असल्याने नृत्य करणार्याला त्याच्या भावानुसार आध्यात्मिक अनुभूती येतात. सात्त्विक नृत्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे नृत्य करणारा आणि ते पहाणारा यांना आध्यात्मिक लाभ होतात. भारतीय शास्त्रीय नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘नृत्य करतांना त्यांना देवीचे अस्तित्व जाणवत होते. तसेच सूक्ष्मातून देवीचे दर्शनही झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३०.४.२०२४)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |